प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करावे? - पुढारी

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करावे?

प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. सकस आणि संतुलित आहार, चांगली झोप, दररोज व्यायाम, लस घेणे, वजन कमी ठेवणे, धूम्रपान न करणे, अकारण ताण न घेणे या गोष्टींचा अवलंब करत चांगली रोगप्रतिकारशक्ती बाळगू शकता.

प्रत्येक व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. कोरोनाच्या लाटेत रोग प्रतिकार शक्तीचे महत्त्व संपूर्ण जगाला कळून चुकले. म्हणूनच सर्व आरोग्यतज्ज्ञ देखील सर्व प्रकारच्या व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्याबाबत सल्ला देत आहेत. सध्या काळानुसार नवनवीन व्हेरियंट समोर येत आहेत. पण प्रतिकार शक्ती चांगली असेल तर त्यास फारसे घाबरण्याचे कारण नाही. प्रतिकार शक्ती कमकुवत आहे, हे काही लक्षणांवरून सहज समजू शकते.

* स्ट्रेस लेव्हल हाय : कोणत्याही कामानंतर थकवा येणे साहजिकच आहे. परंतु अमेरिकन सायकोलॉजी असोसिएशनच्या मते, एखाद्याला दीर्घकाळापर्यंत ताण किंवा स्ट्रेस राहत असेल तर ते कमकुवत इम्यून सिस्टीमचे लक्षण मानायला हवे. परिणामी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

* नेहमीच सर्दी असणे : नेहमीच सर्दी-पडसं राहत असेल किवा 7 ते 10 दिवसांच्या कालखंडानंतर सर्दी होत असेल तर ते देखील कमकुवत प्रतिकार शक्तीचे लक्षण मानायला हवे. वर्षातून दोन तीनदा सर्दी होणे सामान्य आहे. परंतु त्यापेक्षा अधिक वेळा सर्दी होत असेल तर प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे.

* पोटाचे विकार : आपल्याला सातत्याने जुलाब, गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर ते प्रतिकार शक्ती कमकुवत असण्याचे लक्षण असू शकते. तब्बल 70 टक्केप्रतिकार शक्ती ही पचनसंस्थेत असते. कारण तेथे आढळून येणारे बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव हे आतड्यांना संसर्गापासून बचाव करतात आणि प्रतिकार शक्ती मजबूत करतात.

* जखम भरण्यास वेळ लागणे : प्रतिकार शक्ती चांगली असणार्‍या व्यक्तीच्या शरीरावरची कोणतीही जखम किंवा व्रण भरण्यास फारसा वेळ लागत नाही. परंतु ज्याची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे, त्यांची जखम भरण्यास विलंब होतो. जखम भरण्यास वेळ लागत असेल तर आपली प्रतिकार शक्ती कमकुवत आहे, असे समजा.

* सतत संसर्ग होणे : इम्यूनिटी किंवा रोग प्रतिकार शक्ती चांगली नसेल तर आपण सतत आजारी पडू शकता. अमेरिकी अ‍ॅकॅडेमी ऑफ अ‍ॅलर्जी अस्थमा अँड इम्यूनॉलॉजीच्या अहवालानुसार, वयस्कर लोकांत प्रतिकार शक्ती कमी असल्याचे संकेत सांगता येईल.

* वर्षभरातून चारपेक्षा अधिक वेळा कानात संसर्ग होणे.

* वर्षातून दोनदा न्यूमोनिया होणे

* वर्षातून तीनदा बॅक्टेरियल सायनस

* वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळेस अँटीबायोटिक औषधांचा वापर

* नेहमीच थकवा जाणवणे : नेहमीच थकवा जाणवणे आणि शरीरात उत्साह न राहणे हे कमकुवत प्रतिकार शक्तीचे लक्षण आहे. प्रतिकार शक्ती कमी असेल तर शरीरदेखील अशक्त होते आणि थकवा जाणवू लागतो.

प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करावे?

* प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर जीवनशैलीत काही बदल करावे लागतील आणि काही उपायांचा आधार घ्यावा लागेल. सकस आणि संतुलित आहार, चांगली झोप, दररोज व्यायाम, लस घेणे, वजन कमी ठेवणे, धूम्रपान न करणे, अकारण ताण न घेणे या गोष्टींचा अवलंब करत चांगली रोग प्रतिकार शक्ती बाळगू शकता. फलहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉ. भारत लुणावत

Back to top button