मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान- छगन भुजबळ

छगन भुजबळ,www.pudhari.news
छगन भुजबळ,www.pudhari.news
Published on
Updated on

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मराठी भाषा ही अतिशय प्राचीन भाषा असून मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी संत साहित्याचे योगदान अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवल्यातील ममदापुर येथे आयोजित बहिणाबाई सप्ताह निमित्त आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी अनिल पाटील महाराज, मधुसूदन महाराज मोगल, अर्जुन महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, बाळासाहेब दाणे, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, भाऊसाहेब धनवटे, सचिन सोनवणे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, बहिणाबाई सप्ताहात वारकरी सांप्रदायातील अतिशय महान वक्त्यांनी धार्मिक व सामाजिक प्रबोधनाचे अतिशय महत्वपूर्ण कार्य केले आहे. आज एकविसाव्या शतकात विज्ञान-तंत्रज्ञानाने सारी सुखे माणसाजवळ आली असली, तरी माणूस अस्वस्थ आहे. संतांनी यासाठी वैश्विक एकात्मतेची शिकवण देऊन स्वत:चे चैतन्यस्वरूप ओळखण्यास शिकवले असून विश्वात्मक ईश्वराची सेवा करण्यात मानवी जीवनाचे सार्थक आहे, ही जीवनदृष्टी त्यांनी दिली. संतांच्या मांदियाळीत अनेक स्त्रीसंतांचाही महत्त्वाचा वाटा आहे. अनेकांनी मराठी जीवनाला व साहित्याला समृद्ध केले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले की, संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या स्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे. संतांच्या कृपेने उभ्या राहिलेल्या या वारकरी इमारतीचा कळस तुकाराम महाराज आहे, अशी स्पष्टोक्ती बहिणाबाई यांनी दिली आहे. संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती असे त्यांनी सांगितले.

संत बहिणाबाईंच्या अभंगात आरंभी आदिनाथ शंकरापासून गुरूपरंपरा दिलेली आहे. त्यानंतर आत्मनिवेदनपर अभंगातून त्यांचे जीवन उलगडते. हे अभंग त्यांचे खास वैशिष्ट्य. बहिणाबाईँनी केवळ गुरूचे मातापित्यांचे उल्लेख न करता आत्मचरित्रच जणू लिहून ठेवले आहे. एकूण ७८ अभंगांतून हे अद्भूत आत्मचरित्र आले आहे. बहिणाबाईंचे एकूण ७३२ अभंग प्रकाशात आले आहेत. काव्य दृष्ट्यादेखील बहिणाबाईंचे अभंग सरस आहेत. अनुप्रास, यमक, उपमा, रूपक, दृष्टांत, अनन्वय, विरोधाभास अशा अनेक अलंकारांनी ते नटले आहेत. करूणरस, वत्सलरस, हास्यरस, भयानकरस, अद्भुतरस, वीररस, भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत. शांतरसाचा आविष्कार काव्यात सर्वत्र दिसतो. संत बहिणाबाई यांनी गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

मेळ्याच्या बंधाऱ्याचे काम लवकरच सुरू

राजापूर ममदापुर परिसरासाठी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या मेळाच्या बंधाऱ्याला मान्यता मिळालेली आहे. या मेळाच्या बंधाऱ्याच्या कामाची वर्क ऑर्डर झालेली असून वनविभागाच्या परवानगी अंतिम टप्प्यात आहे. वन विभागाच्या परवानगीनंतर काम लवकरच सुरू होईल असे छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news