कांदिवलीत बारा वर्षीय मुलीचा विवाह उरकला; 27 वर्षीय आरोपी पतीला अटक | पुढारी

कांदिवलीत बारा वर्षीय मुलीचा विवाह उरकला; 27 वर्षीय आरोपी पतीला अटक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईच्या कांदिवली परिसरात एका बारा वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी सुशीलकुमार लखीराम राजपूत या पतीला अटक केली असून, बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

अवघ्या 12 वर्षीय मुलीशी लग्न करणारा सुशीलकुमार राजपूत तब्बल 27 वर्षांचा आहे. नोकरदार असूनही हा गुन्हा करताना त्याला जराही लाज वाटली नाही. आता नोकरीही जाणार आणि छी थू झाली ती वेगळीच.

बालविवाहाला बंदी असताना या मुलीचा जून महिन्यात सुशीलकुमारसोबत बालविवाह लावण्यात आला. तक्रारदार समाजसेवकाला कांदिवलीतील मैत्रिणीकडून या बालविवाहाची खबर लागली आणि या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्यास देखील तिने मदत केली. ही मैत्रीण कांदिवलीतील स्कायवॉकजवळ काही मुलांची शिकवणी घेते. एक बारा वर्षांची मुलगी काही दिवसांपासून शिकवणीसाठी येत नसल्याचे लक्षात येताच तिने माहिती घेतली असता या मुलीचे लग्न झाल्याचे तिला समजले. शोधमोहीम हाती घेत सोमवारी दुपारी या मुलीला कांदिवलीतील लोखंडवाला टाऊनशीप शाळा परिसरातून ताब्यात घेतले. समतानगर पोलिसांनीही तिथे धाव घेतली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर या मुलीची चौकशी केली असता बालविवाहाचा आणखी उलगडा झाला.

23 जून 2022 रोजी सुशीलकुमारसोबत या मुलीचे लग्न लावण्यात आले. तो नोकरी करीत असून कांदिवलीतील हनुमाननगर, भोसले चाळीत राहतो. लग्नानंतर शारीरिक संबंध आले नसल्याचे या मुलीने सांगितले. मात्र, तिने स्वखुशीने तिच्या पालकांच्या मर्जीने हा विवाह केला, असा जबाब तिने दिला. या मुलीचे वय 12 वर्षे दोन महिने आणि दोन दिवस असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

Back to top button