कोझिकोड; पुढारी ऑनलाईन : केरळच्या मलप्पुरममधील दोन मुस्लिम विद्यार्थ्यांनी रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोहम्मद जबीर पी के आणि मोहम्मद बासिथ एम हे अव्वल ठरले आहेत. या स्पर्धेत १ हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अव्वल ठरलेले दोघे विद्यार्थी मलप्पुरमम जिल्ह्यातील केकेएचएम इस्लामिक अँड आर्ट्स कॉलेज, वलँचेरी येथे शिक्षण घेत आहेत.
आठ वर्षांच्या Wafy प्रोग्राम अंतर्गत ते पोस्ट-ग्रॅज्युएशनपर्यंत इस्लामिक धर्माचा अभ्यास करत आहेत. ज्यात नियमित विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमाचादेखील समावेश आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख आदी धर्मांच्या अभ्यासाचादेखील Wafy course मध्ये समावेश असून याचा आम्हाला फायदा झाल्याची प्रतिक्रिया जबीर याने दिली आहे. या अभ्यासक्रमात ख्रिश्चन, यहुदी, ताओ धर्माशी संबंधित एक पेपर देखील आहे.
"वॅफी कोर्सचा अभ्यासक्रम प्राचार्य अब्दुल हकीम फैझी अद्रिसरी यांच्या नेतृत्वाखालील इस्लामिक महाविद्यालयांच्या समन्वयाने तयार केलेला आहे. विद्यार्थ्यांना बहु-धार्मिक समाजात राहताना सर्व धर्मांविषयी माहिती असावी या उद्देशाने आम्हाला सर्व धर्मांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्या दृष्टीकोनानुसार, अभ्यासक्रमात विविध धर्मांचा तपशीलवार अभ्यास करणारे मॉड्यूल आहेत," असे जबीरने सांगितले. अभ्यासक्रमातून प्रेरित होऊन, काही ज्येष्ठ लोक आता विदेशी विद्यापीठांमधून इस्लाम आणि बौद्ध धर्म तसेच इस्लाम आणि शीख या धर्मांच्या तुलनात्मक अभ्यासामध्ये पीएचडी करत आहेत, असेही त्याने सांगितले.
अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून रामायणाचा अभ्यास केला आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या अतिरिक्त वाचनही केले, असे जबीर सांगतो. "रामायण या महाकाव्याचा अभ्यास करताना मला याची जाणीव झाली की सर्व धर्मातील लोकांनी एकमेकांच्या धार्मिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. विविध धर्मांचा अभ्यास केल्यास धर्माच्या नावावर होणारा हिंसाचार रोखण्यास मदत होईल. सर्व धर्म एकमेकांवर प्रेम आणि आदर करायला शिकवतात. रामायण हे प्रेम आणि शांतता या मुल्यांचे प्रतिक आहे, असे त्याने पुढे म्हटले.
डीसी बुक्सच्या टेलिग्राम ग्रुपमधून रामायण प्रश्नमंजुषेविषयी माहिती मिळाल्यानंतर त्याने स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. या स्पर्धेसाठी विशेष काही तयारी केली नसल्याचे तो सांगतो. जबीर याने समाजशास्त्रात बीए पूर्ण केले आहे. या स्पर्धेतील आणखी एक विजेता मोहम्मद बसिथ याने मानसशास्त्रातून बीए शिक्षण घेतले आहे.
हे ही वाचा :