हिंगाेली : समोसे पाहून रेल्‍वेत चढल्‍या दोघी अन्..; घरच्यांच्या जीवाला लावला घोर | पुढारी

हिंगाेली : समोसे पाहून रेल्‍वेत चढल्‍या दोघी अन्..; घरच्यांच्या जीवाला लावला घोर

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा: इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी बोल्डा फाटा येथे रेल्वे स्टेशनवर समोसे घेण्यासाठी रेल्वेच्या डब्यात चढल्या. मात्र या दाेघी उतरण्यापूर्वीच रेल्वे सुरू झाली. त्या रेल्वेतून पुढल्या स्टेशनला गेल्या. सायंकाळपर्यंत मुली घरी न आल्याने दोन्ही मुलींच्या वडिलांनी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून मुलींना रात्री ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, असोला (ता. कळमनुरी) येथील दोन मुली सातवीच्या वर्गात आहेत. यावेळी पूर्णाकडे जाणारी रेल्वे उभी होती. त्या रेल्वेमध्ये विक्रेता समोसे विकत होता. त्याच्या हातातील समोस्यांची थाली पाहून त्या दोघींना समोसे घेण्याची इच्छा झाली. त्या दोघी रेल्वेच्या डब्यात चढल्या तेवढ्यात रेल्वे सुरू झाली. दोन्ही मुलींची उतरण्याची पंचायत झाल्याने त्या तशाच रेल्वेतून पुढे निघून गेल्या.दरम्यान, सायंकाळी मुली घरी न आल्याने मुलींच्या वडिलांनी आखाडा बाळापूर पोलिसांत त्वरित फिर्याद दिली.

पोलिसांनी लगेच सूत्रे हलवून पूर्णा येथील पोलीस स्टेशनला माहिती दिली. दरम्यान, मुली पूर्णा स्टेशनवर उतरून इकडे तिकडे भटकत होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. त्यानंतर त्या मुलींना रात्रीच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. मुली सुखरूप मिळाल्याने पालकांनी सुटकेचा निः श्वास सोडला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button