जळगाव/ पुणे; पुढारी वृत्तसेवा: बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुनील झंवर याच्या चौकशीतून अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायिक सुनील झंवर याचाही समावेश होता. तेव्हापासून सुनील हा फरार झाला होता.
सुनील याचा जामीन अर्ज अनेकदा न्यायालयाने नाकारला होता. मध्यंतरी त्याच्या अटकेपासून १५ दिवस दिलासा मिळाला होता. यानंतर मात्र, त्यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली.
सुनील हा वेषांतर करून जळगावात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जंग-जंग पछाडले होते. या दरम्यान आज मंगळवारी (दि.१०) रोजी पहाटे पोलिसांनी नाशिक येथून सुनील झंवर याला अटक केली.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात सुनील झंवरचे पुत्र सूरज झंवर, विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांनाही जामीन मिळाला होता.
बीएचआर गैरव्यवहाराच्या दुसर्या टप्प्यात तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख संशयित असल्याने त्याचा शोध पोलिस घेत होते.
अनेक महिन्यांपर्यंत दोघांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. यानंतर गेल्या महिन्यात जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आली होती.
यानंतर सुनील यांच्या अटकेची प्रतीक्षा होती. आता पुण्याच्या आर्थिक गुन्हा शाखेने सुनील झंवरच्या मुसक्या आवळल्याने या प्रकरणातील चौकशीला गती येणार आहे.
हेही वाचलंत का?