माेसेवाडी वस्‍तीत सापडले बिबट्या चे पिल्लू; परिसरात घबराट | पुढारी

माेसेवाडी वस्‍तीत सापडले बिबट्या चे पिल्लू; परिसरात घबराट

वाडा ; पुढारी वृत्तसेवा :  वाडा ( ता. खेड जि.पुणे) गावच्या मोसेवाडी वस्‍तीत संजय महादू मोसे यांच्या घराच्या मागील बाजूस बिबट्या चे पिल्लू सापडले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची खात्री झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पिल्लाला ताब्यात घेतले, बछडयाला पुन्हा आईच्या कुशीत सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कासारे यांनी दिली.

वाडा गावच्या उत्तरेस गडदू देवीच्या खोऱ्यात मोसेवाडी हि डोंगराच्या पायथ्यांशी असलेली वस्ती आहे.

डोंगराच्या कडेला असल्याने येथे वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. वन समितीच्या माध्यमातून येथे मोठ्या प्रमाणात जंगल वाढलेले आहे.

या वस्तीत राहणाऱ्या संजय महादू मोसे यांना सोमवारी सायंकाळी त्यांच्या घराच्या मागील बाजूस कसला तरी ओरडण्याचा आवाज आला.

त्यांनी त्या दिशेने जाऊन पाहीले. त्‍यावेळी त्‍यांना बिबट्याचे पिल्लू आढळून आले.

खात्री झाल्यावर त्यांनी गजानन सुरकुले, किशोर सुपे, अशोक सुपे, संदिप सुरकुले रमेश उगले यांना याची माहिती देवून त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून याविषयी माहिती दिली. तोपर्यंत त्यांनी त्‍या बछड्याला सुरक्षित ठिकाणी ठेवले.

माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कासारे, राठोड, गुट्टे, शेळके, कंधारकर, नायकवाडे, वनपाल गिरीष कुलकर्णी यांनी तेथे जावून बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले.

बिबट्याचे हे पिल्लू साधारण ३ महिन्याचे असल्याचे सांगितले. वरिष्ठ अधिकारी व माणिकडोह येथील पशुवैद्यकिय डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या पिल्लास त्यांच्या आईच्या कुशीत सोडण्यासाठी सापडलेल्या ठिकाणीच सोमवारी रात्री ठेवले.पण हे पिल्लू मादी बिबट्याने न नेल्याने आज (मंगळवार) रात्री पुन्हा हे पिल्लू तेथे ठेवण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी सांगितले.

परिसरामध्ये बिबट्या-मानव संघर्षाबाबत जनजागृती केली असून, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या भागातील बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. शेतात एकटे जाऊ नये. चार-पाच जणांच्या गटाने जावे. बिबट्या आढळून आला किंवा त्याबाबत काही माहिती मिळाली असता तात्काळ वन विभागाला कळवावे असेही असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Back to top button