सीईटी : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसऱ्यांदा संधी | पुढारी

सीईटी : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दुसऱ्यांदा संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘पेरा’ (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या संस्थेमार्फत जुलै महिन्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी सीईटी (कॉमन एंट्रेंस टेस्ट) घेण्यात आली होती. याला राज्यातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीमुळे ‘पेरा’ या खासगी विद्यापीठाच्या संघटनेकडून पुन्हा दुसऱ्यांदा २७, २८ आणि २९ ऑगस्ट २०२१ रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी २३ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे.

या परीक्षांचा निकाल ६ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन ‘पेरा’ संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष श्री. भरत अग्रवाल यांनी केले.

प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी म्हटले की, ‘पेरा’ संघटनेत राज्यातील १४ खासगी विद्यापीठांचा समावेश आहे. खासगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार, सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षा व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो.

यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी ‘पेरा’ या खासगी विद्यापीठांच्या संघटनांनी २७, २८ आणि २९ ऑगस्ट २०२१ रोजी ऑनलाईन माध्यमांद्वारे सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सीईटीच्या आधारे विद्यार्थी राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून शकतात.

ऑनलाईनद्वारे सीईटी परीक्षा देता येणार

तसेच ‘पेरा’ सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना घरातूनच ऑनलाईन माध्यमांद्वारे ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.

हेही वाचलंत का? 

पाहा : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील

Back to top button