नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दुष्काळ, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांबरोबरच पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणार्या आदिवासींच्या लेकी यंदा नाशिकबरोबरच मुंबई, पुणे, ठाणे आणि वाशी प्रमुख महानगरांतील यंदाची होळी उजळविणार आहेत. दरवर्षी परंपरागत पद्धतीने केवळ नाशिकमध्येच गोवर्या विकणार्या आदिवासी महिला, युवतींना यंदा श्री गुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीद्वारे 'गोमय गोवरी' या प्रकल्पांतर्गत विविध महानगरांची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात दुर्गम समजल्या जाणार्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांनी तयार केलेल्या सुमारे 60 ते 65 हजार गोवर्या या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिकसह ठाणे, पुणे, मुंबई, वाशी या महानगरांत पोहचविल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर, पेठ या तालुक्यांतील वाड्या-पाड्यांवरील महिला या दरवर्षी होळीला नाशिकमध्ये गोवर्या आणून विक्री करीत असतात.
मात्र, सलग दोन वर्षे कोरोनामुळे या महिलांना गोवर्या विक्री करता आल्या नव्हत्या. यंदा मात्र, कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने या महिलांनी शहराची वाट धरली आहे. मात्र, त्यांच्या एका ठिकाणी बसून गोवर्या विक्रीच्या पद्धतीला सेवा संकल्प समितीने ' गोमय गोवरी' या विशेष प्रकल्पांतर्गत अधिक व्यापक केले असून, यामुळे आदिवासी पाड्यांवरील गोवर्या थेट मोठ्या महानगरात पोहोचविल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 65 हजार गोवर्या इतर शहरांत जाणार असल्याचा अंदाज समितीचे कार्यवाह डॉ. राजेंद्र खैरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी महिला या महानगरांची यंदाची होळी उजळविणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पाणी नसल्याने स्वतःची शेती करता येत नाही. जानेवारीनंतर पाच-सहा महिने रोजगारासाठी संपूर्ण कुटुंब, संसार घेऊन शहरात जावे लागते. अशा प्रकारचे रोजगार देणारे काम आम्हाला इथेच मिळाले. पाण्याची सोय झाली तर आमचा संसार असा फिरता राहणार नाही. एका ठिकाणी राहिल्याने आमच्या पोरांच्या भविष्याचाही प्रश्न सुटेल.
– वनिता गोतरणे, वाघचौडा पाडा (ता. त्र्यंबकेश्वर)
वाघचौडा, झंपावडा, कोटंबी, कारमाळा या आदिवासी पाड्यांतील 40 ते 50 महिला या कार्यात सहभागी झाल्या आहेत. एका विशिष्ट साच्यात शेण, माती मिसळून या गोवर्या तयार केल्या जातात. एका गोवरीमागे 2 ते 3 रुपये प्रमाणे प्रत्येक महिलेला 7 ते 8 हजार रुपये मिळतील.
होळीसाठी गोवर्यांबरोबरच लाकूडफाट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. निसर्गाचा हा र्हास थांबावा या उद्देशाने होळीला गोवर्यांचाच अधिक वापर व्हावा तसेच यातून आदिवासी महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने सेवा संकल्प समितीने गत पाच ते सहा वर्षांपासून हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.