जगण्याची दिशा

दिशा www.pudhari.news
दिशा www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : चंद्रमणी पटाईत

जन्माला येणं, कोणत्या रूपात जन्माला येणं, हे काही आपल्या हातात नसतं, असं म्हटलं जातं. आई-वडिलांच्या गुणसूत्रांच्या केमिस्ट्रीतून मुलगा किंवा मुलगीरूपी बाळाचा जन्म होत असतो. मात्र, मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, असं बाळ जन्माला आलं, तर पारलिंगी किंवी तृतीयपंथी समूहातील समजलं जातं. साधारण स्त्री-पुरुष लिंगांमधील बाळांचे लाडकोड भरपूर पुरवले जातात. समाजात वावरतच ते मोठेही होतात. परंतु पारलिंगी समुदायात जन्माला आलेलं बाळ मात्र, अनेक अपमानास्पद घटनांना तोंड देत मोठं होतं. त्या परिस्थितीतून ताऊन-सुलाखून संघर्षातून आपली वाट चोखाळू लागतं. त्यातून समाजात आपलं नवं स्थान निर्माण करतं. जगण्यासाठी दाहीदिशा करत, अशा पारलिंगी समुदायातूनच जन्माला आलेलं बाळ अनेकांचा आदर्शही ठरू शकतं, लढवय्या नेता ठरू शकतं, उत्तम कलाकार, वक्ता, कवी, साहित्यिक इतकंच नव्हे, तर अनेकांची माय-बाप आणि आधारही होऊ शकतं. असं चित्र पाहणं म्हणजे मनाला गारवा देणारंच म्हणावं लागेल. मात्र, हे चित्र निर्माण करताना त्या जिवाची झालेली काहिली, त्याची झालेली घालमेल आणि समाजाने दिलेल्या कडू-गोड अनुभवांची शिदोरी हीच त्याला उभी करण्यात मोठी जमेची बाजू असते. याच शिदोरीमुळे स्त्री-पुरुषांना लाजवेल, अशी कामगिरी नव्हे, कर्तृत्व करणारं एक नाव म्हणजे दिशा पिंकी शेख (माई).

मित्रहो, आज अचानक दिशा यांच्याबद्दल शब्दप्रपंच करण्याचं कारण म्हणजे दिशाचा वाढदिवस. शब्दरूपी सुमनांनी तिचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा तर देता येतीलच. पण, पारलिंगी समुदायातील अनेकांना दिशा ठरणार्‍या दिशादर्शकाबद्दलही इतरांना सांगायलाच हवं. नाही का? आजची दिशा पिंकी शेख पूर्वाश्रमीची अनेक नावांनी ओळखली जाणारी व्यक्ती. नाशिक जिल्ह्यातल्या येवला शहरात कधी मुलगा, कधी मुलगी, तर कधी हिजडा म्हणून संबोधत तिचं बालपण गेलेली पारलिंगी व्यक्ती. मूळ गाव येवला असलं, तरी जशी दिशा वयात येऊ लागली, समाजातील शिक्षक, प्रबोधनकारांच्या सहवासात आली, तशी तिला दिशा मिळू लागली. जगण्याकडे एका वेगळ्या अंगाने पाहू लागली आणि कधी पारंपरिक समुदायातील गुरू, तर कधी चळवळीतील गुरुजनांच्या सानिध्यात उठू-बसू लागली. विचारांचं आदान-प्रदान करू लागली. स्वत:ला शोधू लागली. वाचन करू लागली. सर्व कसोट्या पडताळून पाहू लागली. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी करू लागली. भटकत भटकत सबंध महाराष्ट्र पायदळी तुडवत दिशा आज अनेकांची माय-बाप तसेच मित्र, नेता, कवयित्री अशा अनेक भूमिका निभावत आहे. दिशाने राज्यभर खंडीने मित्र जोडले आहेत. मधुरवाणी असलेली दिशा एकदा विचारपीठावरून बोलायला लागली की, रसिक जागेवरून उठण्याची हिंमतच करू शकत नाहीत. मार्मिक आणि रसाळ वाणी ऐकण्याची पर्वणीच असते, जेव्हा दिशा बोलत असते, कविता सांगत असते तेव्हा. दिशाने अनेक चटके, हाल-अपेष्टा सहन करून, यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण केलेलं आहे. या वाटेत तिला अनेक काटेही दिसले. ते बाजूला सारत आज ती बुद्ध-फुले-शाहू-कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचारांचा जागर करत पारलिंगी समाजच नव्हे, तर जे जे न्याय्य-हक्कांपासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी धडपडताना दिसते आहे. दिशाच्या जडणघडणीत श्रीरामपूर शहराचाही मोठा वाटा आहे. तिथे तृतीयपंथीयांनी त्यांच्या जमापुंजीतून उभारलेलं घर (दयार) आज सर्वधर्मसमभाव जोपासणारं आदर्श स्थळ नव्हे, तर परिवर्तनवादी विचारांचा खजिना असलेलं ठिकाण झालं आहे. याच 'दयार'मध्ये राहून आजही दिशा सामाजिक आणि राजकीय कार्यात तन-मन-धनाने सक्रिय आहे. त्यामुळे समाजही आज तृतीयपंथीयांकडे तेही आपल्यातील एक घटक आहेत, हे समजू लागला आहे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याची समाजाची नजरही बदलू लागल्याचं आशादायी चित्र दिसू लागलं आहे. तृतीयपंथीयांनाही मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न होत आहेत, तर दिशासारख्या अनेक तिच्या साथीदारही या चळवळीत दिशाच्या खांद्याला खांदा लावून 'हम भी कुछ नही' हे दाखवून देऊ लागल्या आहेत. दिशाचा आज जन्मदिन. दिशाने इतरांनाही आपल्या मायेनं सावरावं, आणखी मोठ्ठं व्हावं, वंचित, उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाचं स्वप्न घेऊन पुढे जावं, स्वत:च्या अडचणींवर जशी मात करत आलीस तशीच पुढेही समाजातील इतर भावंडांच्या सोबतीने क्रांतीकडे जावं, तू पाहिलेली सारी स्वप्नं पूर्ण होवोत, तुला निरामय दीर्घायुष्य लाभो, या मंगलकामना.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news