भाजप नेते बग्गा यांच्यावर कठोर कारवाई करू नका : पंजाब-हरियाणा हायकोर्ट | पुढारी

भाजप नेते बग्गा यांच्यावर कठोर कारवाई करू नका : पंजाब-हरियाणा हायकोर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्या अटकेला 10 मे पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बग्गा यांच्या अटक वॉरंटविरोधातील याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर हा निर्णय घेतला. मोहाली कोर्टाने जारी केलेल्या अटक वॉरंटविरोधात बग्गा यांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शनिवारी संध्याकाळी उशिरा न्यायालयाने न्यायमूर्ती अनूप चितकारा यांच्या निवासस्थानी सुनावणीला परवानगी दिली. मध्यरात्री या याचिकेवर सुनावणी झाली आणि बग्गा यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. बग्गा यांचे वकील चेतन मित्तल यांनी सांगितले की, सुमारे 45 मिनिटे सुनावणी चालली. बग्गा यांच्या याचिकेवर 10 मे रोजी सुनावणी होणार आहे.

यापूर्वी मोहाली न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी रवतेश इंद्रजीत यांच्या न्यायालयाने बग्गा यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. मोहाली न्यायालयाने पंजाब पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला बग्गा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच बग्गा शनिवारी रात्री पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले आणि अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. बग्गा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनूप चितकारा म्हणाले की, तेजिंदर बग्गा यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये.

बग्गा यांना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर त्यांचे वडील प्रीतपाल सिंग बग्गा यांनी आनंद व्यक्त केला. प्रीतपाल म्हणाले की, त्यांना (पंजाब सरकार) तेजिंदरला कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवायचे आहे. हा लढा दीर्घकाळ चालणार आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनीही बग्गा यांच्या सुटकेवर ट्विट केले आहे. ते म्हणाले की, कायद्याच्या राज्याचा आणखी एक विजय झाला आहे.

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी शनिवारी रात्री उशिरा बग्गा यांच्या अटकेवर सस्पेंस कायम होता. पंजाब पोलिसांचे पथक बग्गा यांना अटक करण्यासाठी केव्हाही दिल्लीला रवाना होऊ शकतात, असे बोलले जात होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांचे पथक तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना अटक करण्यासाठी रविवारी पुन्हा दिल्लीला पोहोचणार होते. यावेळी पंजाब पोलीस कोणतीही कायदेशीर कमतरता सोडण्याचा प्रयत्न करत नव्हते. त्यासाठी न्यायालयाच्या अटक वॉरंटसह इतर सर्व कायदेशीर कागदपत्रेही तयार करण्यात येत होती. पंजाब पोलिसांना सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या नियमांनुसार बग्गाला दुसऱ्या राज्यातून अटक करून पंजाबमध्ये आणण्यात यावेळी कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करायची होती.

पंजाब पोलीस बग्गा यांना अटक करण्यासाठी का आले?

आम आदमी पक्षाचे नेते डॉ. सनी सिंग यांच्या तक्रारीवरून मोहालीमध्ये धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला होता. बग्गा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना काश्मिरी पंडितविरोधी म्हटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पंजाब पोलीस बग्गा यांच्या शोधात होते. ते पहिल्यांदा दिल्लीत आले तेव्हा त्यांना बरंगला परतावे लागले. यानंतर, भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्यांदा जवळपास 50 पंजाब पोलिस कर्मचारी बग्गा यांना त्यांच्या घरातून अटक करून पंजाबला घेऊन जात होते, ज्यांना दिल्ली पोलिसांच्या आवाहनानंतर हरियाणा पोलिसांनी रोखले होते.

Back to top button