नाशिक : कपालेश्वर महादेव शिवलिंग वज्रलेपनास विरोध ; गुरव, पुजाऱ्यांना नवनियुक्त विश्वस्त विश्वासात घेत नसल्याचा आरोप

नाशिक : कपालेश्वर महादेव शिवलिंग वज्रलेपनास विरोध ; गुरव, पुजाऱ्यांना नवनियुक्त विश्वस्त विश्वासात घेत नसल्याचा आरोप

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

श्री कपालेश्वर महादेव मंदिराचे नवनियुक्त विश्वस्त हे गुरव, पुजारी, तेथील रहिवासी आणि भाविकांना विश्वासात न घेता आपला मनमानी कारभार करत आहे. तर नवनियुक्त झालेल्या विश्वस्तांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचा आरोप मुख्य पुजारी हेमंत (पप्पू) गाडे यांनी केला आहे.

संबधित बातम्या :

मागील आठवड्यात विश्वस्तांनी शिवलिंगाचे वज्रलेप करणार असल्याचे जाहीर करताच गुरव, ब्राह्मण आणि पुजारी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. तत्कालीन प्रशासकांनी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. मंदिर डागडुजी करण्यासाठी जो लाखो रुपये खर्च केला गेला आहे, त्या खर्चाचा व कामाचा तपशील जनतेसमोर अजूनही मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे ते काम ठेकेदार किती कालावधीत पूर्ण करणार आणि त्याची जी निविदा काढण्यात आली होती त्या व्यतिरिक्त किती खर्च झाला याचीदेखील माहिती गुरव, ब्राह्मण आणि भक्तांना देण्यात आली नाही. परिसरात काम करताना समाध्यांना नुकसान पोहोचल्याचा आरोपही करण्यात येतो आहे.

पोलिसांनी मंदिर परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत करण्याची सूचना दिली असल्याने नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना मंदिराच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणावर खिळे ठोकण्यात आले. त्यामुळे एकीकडे लाखो रुपये खर्च करून मंदिराच्या दुरुस्तीचे काम करायचे आणि दुसरीकडे मंदिराला खिळे ठोकण्याचे काम विश्वस्तांकडून केले जात असल्याने नक्की यातून विश्वस्तांना काय साध्य करायचे, असा सवालही गाडेंनी केला.

आम्हाला काम करण्यासाठी नियुक्त केल्याने आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वज्रलेपनाचे काम करणारच. शिवलिंग झिजल्याची माहिती आजपर्यंत लपवण्यात आली होती. याबाबत माहिती समोर आल्यानंतर आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने वज्रलेपनाचा निर्णय घेतला आहे. तसेच, मंदिर परिसरातील कुठलीही समाधी तोडलेली नाही. जुन्या समाधी भंग झाल्याचे दिसून आल्याने त्याबाबत दगड घडविण्याचे काम सुरू आहे.

– मंडलेश्वर काळे (अध्यक्ष, श्री कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news