सौदीत अडकलेल्या पुण्यातील तीन महिलांची सुटका
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य महिला आयोगाने सौदी अरेबिया येथून पुण्यातील तीन महिलांची सुटका केली. या महिला एका दलालाच्या माध्यमातून नोकरीसाठी तेथे गेल्या होत्या. तेथे गेल्यानंतर त्यांना मारहाण करून उपाशीपोटी ठेवण्यात येत होते. याप्रकरणी आता दलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अपर पोलीस आयुक्त पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते. सुटका करण्यात आलेल्या तिन्ही महिला एकाच कुटुंबातील होत्या.
घरावर कर्ज असल्याने त्यांना एका ओळखीच्या महिलेने सौदी अरेबियात काम करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्या मुंबईतील एका एजंटमार्फत सैदी अरेबियात गेल्या. तेथील एजंटने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घरकामासाठी पाठवले. मात्र, घरमालकांकडून त्यांना मारहाण करण्याबरोबरच उपाशीपोटी ठेवले जात होते. तसेच ठरल्याप्रमाणे 40 हजार पगारही देण्यात येत नव्हता. त्यांनी मुंबईतील दलालाशी संपर्क साधून परत भारतात आणण्याची विनंती केली.
मात्र, त्याच्याकडून सातत्याने टाळाटाळ होत होती. दरम्यान, एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना राज्य महिला आयोगाचा मेल आयडी मिळाला. यातील एका महिलेने तेथे मेल करून सुटका करण्याची विनंती केली. त्यानुसार महिला आयोगाने मागील तीन महिने सातत्याने प्रयत्न करून त्यांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया राबवली. आठ दिवसांपूर्वीच त्या पुण्यात दाखल झाल्या.
राज्य महिला आयोगाने आजवर 20 महिलांची परदेशातून सुटका केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील जास्त करून महिला गल्फ कंट्रीजमध्ये नोकरीनिमित्त गेलेल्या आहेत. तेथे गेल्यावर एजंट पासपोर्ट व इतर कागदपत्रे काढून घेतात. फसवणूक करतात. अशा वेळी त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी राज्य महिला आयोगाशी संपर्क साधावा.
– रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग
हेही वाचा

