

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नियुक्त केलेली तीन नेत्यांची समिती कॉंग्रेस श्रेष्ठींनी गुंडाळली असून शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) या पक्षांसमवेत वाटाघाटींसाठी नवी समिती नेमली जाणार आहे.
कॉंग्रेस संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून शनिवारी (दि. २१) लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर, महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या वाटाघाटींसाठी कॉंग्रेसच्या नेत्यांची नवी यादी लवकरच जाहीर होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या यादीत कोणते नेते असतील याचा खुलासा थोरात यांनी केला नाही.
लोकसभेतील जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी समन्वय समितीची नेमल्याची माहिती समोर आली होती. या समितीमध्ये शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांचा समावेश असून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान या नेत्यांना जागावाटपाच्या चर्चेची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वाकडून संमती न घेता परस्पर ही नावे जाहीर केल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर, स्थानिक नेत्यांशी चर्चेतूनच नवी यादी तयार करण्याचे संकेतही पक्षश्रेष्ठींनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज वेणुगोपाल यांनी बाळासाहेब थोरात यांना बोलावून बातचित केली.
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पटोले तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गोपनीय दिल्ली दौरा केला होता. त्यादरम्यानही पक्षांतर्गत वाद, नेतेमंडळींच्या आपसातील कुरघोड्या, निवडणूक तयारी यावर श्रेष्ठींसमवेत प्राथमिक बातचित झाल्याची माहिती समोर होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा सुरू झाली होती.
या साऱ्या घटनाक्रमावर आज पत्रकारांशी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांच्या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील लोकसभेच्या तयारीबाबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या चर्चेबाबत थोरात यांनी कानावर हात ठेवले. 'आजच्या भेटीत ती चर्चा झाली नाही. राज्यातही कुठेही प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चा नाहीत,' असे सांगत थोरात यांनी पक्ष संघटनेतील बदलाच्या वादापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर भाष्य करताना 'ज्यांचा खरा विरोध भाजपाला विरोध आहे ते पक्ष सोबत येऊ शकतात. त्यांचा फक्त विरोध खरा हवा. प्रकाश आंबेडकर, महादेव जानकर सोबत येत असतील तर स्वागतच आहे, असेही थोरात म्हणाले.
विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसने विशेष निरीक्षक पाठवायला देखील सुरवात केली आहे. याअंतर्गत, केंद्रीय कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तेलंगणाच्या विशेष निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत, एन. एस. बोसेराजू हे देखील विशेष निरीक्षक असतील. संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या दोन्ही निरीक्षकांच्या नावाची आज घोषणा केली.