Nashik Navratri Festival : यंदाचा कालिका नवरात्रोत्सव चौदा दिवस, मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय
नाशिक : पुढारी वृत्तेसवा, सप्तश्रृंगगडावरील सप्तश्रृंगी देवी मंदिराच्या धर्तीवर नाशिकची ग्रामदैवता श्री कालिका मातेचा नवरात्रोत्सव यंदा घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली. (Nashik Navratri Festival)
संबधित बातम्या :
अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कालिका मंदिर समितीतर्फे तयारी सुरू करण्यात आली आहे. समितीतर्फे उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि. ३) बैठक पार पडली. मंदिर समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला पोलिस आयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ. आवेष पलोड, संस्थानाचे खजिनदार सुभाष तळाजीया, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे यांच्यासह महावितरण, मनपा व दुकानदार आदी उपस्थित हाेते. (Nashik Navratri Festival)
केशव पाटील यांनी भाविकांच्या सुरक्षेवर यंदा अधिक भर देण्यात येत आहे. भाविकांसाठी चोवीस तास मंदिर खुले राहणार आहे. मध्यरात्री १ ते ३ या काळात देवीच्या वस्त्रालंकार पूजेसाठी गाभारा बंद राहिल, असे त्यांनी सांगितले. तसेच मंदिर परिसरातील प्रसाद व फुलांची दुकाने २४ तास खुली ठेवावी. मंदिरासमोर पोलिस बंदोबस्त, अग्निशमन विभागाची वाहन, रुग्णवाहिका तैनात करावी. महापालिकेने वाहनतळ उभारताना भाविकांची गैरसोय टाळावी आदी सूचनाही पाटील यांनी केल्या. उत्सवकाळात शहर-परिसरातून दर्शनासाठी महिला भाविक मोठ्या प्रमाणात पायी येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी पेट्रोलिंगमध्ये वाढवावे, अशी विनंती पाटील यांनी केली. यावेळी उपस्थितांनी परिसरात चप्पल स्टॅण्ड उभारावा. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी चोख व्यवस्था करावी आदी सूचना केल्या. बैठकीनंतर मान्यवरांनी मंदिर-परिसरात पाहणी केली.
तर कारवाई होणार
उत्सवकाळात मंदिर परिसरातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळावा, अशा सूचना डॉ. आवेश पलोड यांनी केल्या. नवरात्रीला १० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने दुकानदारांनी त्यादृष्टीने तयारी करावी. गेल्या वर्षी सिंगल प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ५ दुकानदारांवर कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशी आहे तयारी नवरात्रोत्सवाची
-मंदिर-परिसरात ४० सीसीटीव्ही
-भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप
-दर्शनरांगेवर १० सीसीटीव्हीचा वॉच
-संस्थानतर्फे ४० सुरक्षारक्षक तैनात
-दुपारी १२ ते ३ वेळेत ज्येष्ठांना दर्शनासाठी सुविधा
-उत्सवकाळात मंदिर-परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
-विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते घटस्थापनेला महापूजा
हेही वाचा :

