

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पत्नीच्या प्रियकराचा खून करून मृतदेह मुळशी धरणात फेकून देण्यात आला. याप्रकरणी आरोपी पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. किशोर प्रल्हाद पवार, असे खून झालेल्याचे नाव आहे. अक्षय भास्कर खिल्लारे (21, रा. बालेवाडी, मूळ रा. हिंगोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी किशोर पवार हे बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याचा तपास करीत असताना आरोपी अक्षय खिल्लारे याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत होता. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
पत्नीसोबत मयत किशोर पवार याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अक्षय याला होता. या रागातून आरोपीने किशोर यांना जिवे मारण्याचा कट रचला. दरम्यान, 24 सप्टेंबर रोजी त्याने किशोर यांना दुचाकीवरून सुसगाव येथून वारक गावात मुळशी धरणाच्या बाजूला नेले. तेथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबून सोबत आणलेल्या विळ्याने किशोर पवार यांच्या मानेवर, चेहर्यावर वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर किशोर यांचे हात-पाय बांधून मृतदेह वारक गावातील मुळशी धरणाच्या पाण्यात टाकला असल्याचे अक्षय याने तपासात सांगितले.
हेही वाचा