Asian Games 2023 | भारताचा तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्रमध्ये सुवर्णवेध, पदक संख्या ७१ वर | पुढारी

Asian Games 2023 | भारताचा तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्रमध्ये सुवर्णवेध, पदक संख्या ७१ वर

पुढारी ऑनलाईन : आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या कंपाऊंड मिश्र सांघिकमध्ये भारताच्या ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी अंतिम फेरीत सो चावोन आणि जू जाहून या कोरियन जोडीला १५९-१५८ असे हरवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यामुळे आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या ७१ वर गेली आहे. भारताने २०१८ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत ७० पदके मिळवली होती. आता २०२३ च्या क्रीडा स्पर्धेत हा आकडा पार केला आहे. भारत १६ सुवर्ण, २६ रौप्य आणि २९ कांस्यपदकासह पदक तालिकेत चौथ्या स्थानी आहे. (Asian Games 2023)

संबंधित बातमी

ज्योती आणि ओजस यांनी भारताला आज ७१वे पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे. २०१८ च्या जकार्ता स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली होती. तर भारताने चार वर्षांपूर्वी मिळवलेल्या १६ सुवर्णपदकांची बरोबरी साधली आहे.

मिश्र सांघिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ओजस देवतळे याने आधीच वैयक्तिकच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताच्या अभिषेक वर्मानेदेखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत भारत विरूद्ध भारत असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे भारताची तिरंदाजीतील आणखी एक सुवर्ण किंवा रौप्य अशी दोन्ही पदके निश्चित झाली आहेत.

दरम्यान, राम बाबू आणि मंजू राणी यांनी ३५ किमी शर्यतीच्या चालण्याच्या मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे. तर कबड्डीत भारतीय पुरुष संघाने अ गटात थायलंडचा ६३-२६ असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वरदानीचा पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. कुस्तीत भारताच्या सुनील कुमारने ताजिकिस्तानच्या अब्दुलखाएव सुखरोबचा पराभव करत पुरुषांच्या ८७ किलो ग्रीको-रोमनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. (Asian Games 2023)

हे ही वाचा :

Back to top button