Pune Sassoon News : ‘डीन’चे धाबे दणाणले; ‘ससून’च्या झाडाझडतीचा फार्स, वॉर्डच्या समितीला पाठविले पत्र | पुढारी

Pune Sassoon News : ‘डीन’चे धाबे दणाणले; ‘ससून’च्या झाडाझडतीचा फार्स, वॉर्डच्या समितीला पाठविले पत्र

पुणे : ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मधून आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर आता ‘डीन’चेच धाबे दणाणले आहे. अधिष्ठाता
डॉ. संजीव ठाकूर यांच्या युनिटमध्येच आरोपीवर उपचार सुरू होते. त्यामुळे आरोपी पळून गेल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता कैद्यांच्या वॉर्डची देखरेख करणार्‍या समितीला कैद्यांचा तपशील मागणारे पत्र पाठवून झाडाझडतीचा फार्स केला जात आहे.

सध्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एकूण 9 कैदी उपचार घेत आहेत. प्रत्येक कैद्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, वैद्यकीय पार्श्वभूमी, त्यांच्यावर कोणत्या डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत आणि संबंधित कैद्यांना उपचारांसाठी आणखी किती काळ रुग्णालयात ठेवावे लागणार आहे, याबाबतचा अहवाल तातडीने देण्याबाबत डॉ. ठाकूर यांनी वैद्यकीय समितीला पत्र पाठविले आहे.

‘ससून’मधून ड्रग रॅकेट चालविणारा आरोपी पळून गेल्यावर रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. ससूनमधील प्रशासन आणि डॉक्टरांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्यास याबाबत डॉ. ठाकूर यांनी मंगळवारी खुलासा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी दिवसभर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद न दिल्याने आणखी प्रश्न निर्माण होत आहेत. आरोपी ललित पाटीलला हर्नियाचा त्रास होता.

तसेच, तो क्षयरोगाचाही संशयित रुग्ण होता. हर्नियाच्या शस्त्रक्रियेपूर्वी डीनच्या मार्गदर्शनाखाली उपचार होत असताना आरोपीला एक्स-रेसाठी घेऊन जाण्याचा निर्णय कोणत्या डॉक्टरांनी घेतला की यासाठी डीनची परवानगी घेतली होती, आरोपीवर खरेच हर्नियाची शस्त्रक्रिया होणार होती का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ससूनमध्ये तीन लिफ्ट असताना आरोपीला जिन्याने खाली का आणले, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

कॅमेर्‍यांशी जाणीवपूर्वक छेडछाड?

कैद्यांवर उपचार होत असलेल्या वॉर्ड क्रमांक 16 मधील अर्धे कॅमेरे बंद आहेत आणि पॅसेजमधील सुरू असलेले कॅमेर्‍यांचे तोंड भिंतीकडे फिरवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. वॉर्डमधील कॅमेरे चार महिन्यांपूर्वीच नव्याने बसविले होते. अशा वेळी कॅमेर्‍यांशी जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचा संशय निर्माण झाला आहे. आरोपीवर कोणाचा वरदहस्त होता, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ससूनमध्ये वर्ग 4 चा एक कर्मचारी ‘अर्थ’कारण मॅनेज करीत असल्याचीही चर्चा आहे.

मंगळवारी तणावाचे वातावरण

ससूनमधील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये मंगळवारी तणावाचे वातावरण असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या वॉर्डमध्ये 9 रुग्ण आहेत. दुपारपर्यंत केवळ मेट्रन भवारी यांचा वॉर्डात राऊंड झाला होता. अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यापैकी कोणीही वॉर्डकडे फिरकले नव्हते. कन्सल्टिंग डॉक्टर वगळता कोणालाही आत सोडले जात नव्हते. कर्मचारीही एकमेकांशी संवाद न साधता आपापले काम करून निघून जात होते.

हेही वाचा

Mumbai News : नवजात बालकांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Sikkim : तीस्ता नदीला पूर; लष्कराचे २३ जवान बेपत्ता

शरीरातील वात बिघडलाय, आहारात ‘या’ पदार्थांचे प्रमाण कमी करा

Back to top button