अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज 'कॅप्टन्स डे' कार्यक्रमानिमित्त विश्वचषक 2023 (World Cup 2023) चे सर्व कर्णधार एकत्र येतील आणि उद्यापासून पुढचे 46 दिवस, 10 देश भारतातल्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 48 सामने खेळून एकदिवसीय क्रिकेटचा विश्वविजेता ठरवतील. भारताला विश्वचषक आयोजन नवे नाही. 1987, 1996 आणि 2011 साली विश्वचषकाचे आपण सहआयोजक होतो. यंदा म्हणजे 2023 चा विश्वचषक प्रथमच पूर्णपणे भारतात होत आहे. भारतासारख्या विशाल देशाचे हे व्यासपीठ जगासमोर आणायची यानिमित्ताने भारताला नामी संधी आहे. 1987 साली भारताची अर्थव्यवस्था फक्त 287 बिलियन डॉलर होती तीच आता महासत्ता होण्याच्या मार्गावर जगात पाचव्या क्रमांकावर 3.74 ट्रिलियन डॉलरची आहे. क्रिकेटमध्ये आपण महासत्ता आहोतच; पण या विश्वचषकाच्या निमित्ताने होऊ घातलेल्या महासत्तेच्या आयोजनाची कुवत दाखवणारा एक मोठा शोकेस इव्हेंट आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम जेव्हा 1,40,000 प्रेक्षकांनी भरून जाईल, तेव्हा या क्रिकेटच्या महासोहळ्याची भव्यता जगासमोर उलगडली जाईल. विश्वचषकाचे आयोजन हे शिवधनुष्य आहे आणि ते पेलायला निव्वळ आर्थिक बाजू भक्कम असून चालत नाही, तर आयोजनातील अनेक पैलूंचा कस लागतो. पाकिस्तानच्या सुरुवातीच्या आडमुठेपणावर आपण मात केली; पण यामुळे आपण जेमतेम शंभर दिवस आधी वेळापत्रक आयसीसीला दिले आणि तेही पुन्हा बदलावे लागले. इतक्या बदलांनंतरही टिपिकल भारतीय जुगाड पद्धतीने आपण हे आयोजन यशस्वी करू, यात शंकाच नाही. आता फक्त एकच अडथळा संभाव्य आहे तो हवामानाचा. 2019 च्या विश्वचषकात पावसाने बरीच षटके आणि सामने खाल्ले होते. तेव्हा कारण होते ते इंग्लंडच्या लहरी हवामानाचे; पण आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतुचक्रात झालेला बदल या विश्वचषकात काही सामन्यांचे भवितव्य ठरवेल. महाराष्ट्रात परतीचा पाऊस सुरू झाला असला, तरी आसाम असो वा केरळ, सराव सामन्यांत आलेला पावसाचा व्यत्यय, हिमाचलमध्ये अजूनही पावसाचे सावट असल्याने धर्मशालाच्या मैदानाची आणि खेळपट्टीची युद्धपातळीवर तयारी इत्यादी बाबी शेवटपर्यंत सर्वच संघांची घालमेल वाढवणार आहे.
1992 च्या विश्वचषकानंतर आयसीसीने 2019 साली राऊंड रॉबिन पद्धत पुन्हा चालू केली. प्रत्येक संघ बाकीच्या सर्व संघांशी खेळणार असल्याने जो विश्वविजेता असेल तो स्पर्धेतील प्रत्येक संघाबरोबर खेळून झालेला असेल. विश्वचषकाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दोनवेळेचा विजेता वेस्ट इंडिजचा संघ नसल्याने सर्वांना चुकल्यासारखे वाटणार आहे. भारताचा विश्वचषकातील प्रवास 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीने चालू होईल, तो उर्वरित 8 संघांशी 8 वेगवेगळ्या ठिकाणी खेळून बंगळूरला 12 नोव्हेंबरला नेदरलँडस्शी खेळून पुरा होईल. या विश्वचषकात पाकिस्तान सुरक्षेच्या कारणास्तव हैदराबाद, बंगळूर, कोलकाता, चेन्नई इथे प्रत्येकी 2, तर भारताबरोबरचा 'हाय व्होल्टेज' सामना अहमदाबादला अशा पाचच शहरांत खेळणार आहे; पण बाकी सर्व संघांना पूर्ण भारत दर्शन आहे. भारतासारख्या विशाल देशात खेळताना ठिकठिकाणच्या हवामानाला जुळवून घेताना सर्व संघांच्या फिटनेसचा कस लागणार आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषक असतो तेव्हा सर्वात सोयीचे काय असेल तर प्रवास. क्रिकेटच्या कुठच्याही दोन केंद्रातला प्रवास रेल्वेने चार तासांच्या वर नसेल. तीच तर्हा ऑस्ट्रेलियाची. एक पर्थ सोडले, तर वेस्टर्न ऑस्ट्रेलियात विमानाने तास-दीड तासात सर्व शहरे जोडली आहेत.
भारतात मात्र त्या मानाने प्रवास दमवणारा आहे. भारतात हा विश्वचषक होत असल्याने भारतीय संघाला जिकडे जातील तिथे प्रचंड पाठिंबा असेल, ही मोठी जमेची बाजू आहे; पण त्याचबरोबर संघाला विश्वचषक जिंकायचे दडपण असेल. भारतीय संघ जिथे विमानतळ, हॉटेल, जिथे जाईल तिथे त्यांना भेटणारा सामान्य माणूस एकच सांगेल ते म्हणजे विश्वचषक जिंकून या…, या अपेक्षांचे प्रचंड ओझे भारतीय संघावर असणार आहे. भारताला उत्तम सुरुवात मिळवायच्या द़ृष्टीने पहिला आठवडा महत्त्वाचा आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया, 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध महासंग्राम भारताला लढायचा आहे.
या पहिल्या आठवड्यातल्या सामन्यांचा विचार करता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच मालिका जरी भारताने जिंकली असली, तरी दोन्ही संघांना माहीत आहे की, या मालिकेत एकाही सामन्यात दोन्ही संघांनी आपला पूर्ण ताकदीचा संघ उतरवला नाही. रेकॉर्ड बुक्समध्ये आपण मालिका जिंकली; पण हे सराव सामनेच होते. आतापर्यंतच्या विश्वचषकांचा इतिहास बघितला, तर आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जास्त म्हणजे 12 सामने खेळलो आहोत आणि यातले फक्त चार जिंकलो आहोत. गेल्या विश्वचषकात आपण ओव्हलवर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. वर्तमानाचा विचार करता, ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉर्नर, स्मिथ, हेड या प्रमुख फलंदाजांच्या जोडीला लॅब्युशेनचा समावेश झाला आहे. मॅक्सवेल, मिचेल मार्श, एबट, कॅमेरून ग्रीनसारखे घणाघाती फलंदाजी करणारे अष्टपैलू आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा स्टार्क हा सुकाणू असेल. कर्णधार पॅट कमिन्स, हेझलवूड, स्टॉईनिस, ग्रीन आणि मार्श हे साथीला असले, तरी त्यांची फिरकी गोलंदाजी बोथट वाटते. झम्पा आणि मॅक्सवेल यांच्या जोडीला प्रथम अगर होता; पण ऐनवेळी फलंदाजी मजबूत करायला त्याला वगळून लॅब्युशेनला घेतले. याचमुळे लॅब्युशेनला सराव सामन्यात गोलंदाजीचा सरावही करावा लागला.
2019 चा विश्वचषक डावखुर्या जलदगती गोलंदाजांनी गाजवला. तेव्हा इंग्लंडच्या वातावरणात उपजत असलेला स्विंग भारतात नसेल, तरी मिचेल स्टार्क हा भारताच्या आघाडीच्या फलंदाजांच्या द़ृष्टीने सर्वात धोकादायक गोलंदाज आहे. स्टार्कचा एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध इकॉनॉमी रेट 6.14 आणि सरासरी 34.38 म्हणजे खास नाही; पण निव्वळ आकडेवारी ही क्रिकेटमध्ये फसवी असते. त्याचे ऑफ स्टम्पच्या बाहेरचे गुड लेंग्थवरचे चेंडू खेळण्यात रोहित शर्मा आणि गिल किती यशस्वी होतात, यावर भारतीय फलंदाजीचा डोलारा अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि चेपॉकची खेळपट्टी बघताना भारताकडून बुमराह, शमी, सिराज या त्रिकुटापेक्षा कुलदीप, अश्विन, जडेजा हे त्रिकूट खेळायची शक्यता जास्त आहे.
यानंतर अफगाणिस्तानशी आपण दिल्लीत खेळणार आहोत. अफगाणिस्तानचा संघ उत्तम असला, तरी त्यात सातत्य नाही. नबी, राशीद खान, मुजीब-उर-रहमान मिळून उत्तम फिरकी मारा त्यांच्याकडे आहे; पण त्यावरच ते जास्त अवलंबून आहेत. अफगाणी संघाचा कमकुवतपणा आहे तो फलंदाजीत. गुरबाझ आणि झद्रान यांनी फलंदाजीची जबाबदारी घेऊन उत्तम धावसंख्येचा आधार दिला, तरच अफगाणिस्तानचे फिरकी त्रिकूट कमाल करू शकते. भारताच्या गोलंदाजीच्या मार्यापुढेही अफगाण फलंदाजी धावांचा डोंगर उभा करू शकेल, असे वाटत नाही. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा मोठ्या सामन्यांतील अनुभव कमी आहे. तेव्हा या सामन्यात भारताचे पारडे नक्कीच जड असेल. (पूर्वार्ध)
संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागून असलेला क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थात आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आज उद्घाटन सोहळ्याने सुरुवात होत आहे. क्रीडा जगतातील बित्तंबातमी आपल्यापर्यंत पोहोचण्यात दै. 'पुढारी' नेहमीच अग्रेसर राहिला आहे. आता या मोठ्या स्पर्धेची खडान्खडा माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्यासाठी दै. 'पुढारी'चे स्तंभलेखक निमिष पाटगावकर भारताचा आणि इतर प्रमुख सामन्यांचा मागोवा त्यांच्या 'विश्वचषकाच्या रणभूमीतून' या स्तंभातून प्रत्यक्ष मैदानातून घेणार आहेत. निमिष पाटगावकर गेली चोवीसहून अधिक वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात विविध जागतिक स्तरांवरच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांत दूरसंचार, मीडिया आणि मनोरंजन विषयाचे वरिष्ठ तंत्रज्ञान सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. क्रिकेटसह इतर खेळ, तंत्रज्ञान यावरील त्यांचे लेख आणि ललित लेख अनेक नामवंत प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत. दै. 'पुढारी'साठी २०१५ पासूनचे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इतर क्रिकेट मालिका व स्पर्धांचे वृत्तांकन पाटगावकर करत आहेत. त्यांनी २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९ विश्वचषकाचे थेट इंग्लंडहून तसेच २०२२ टी-ट्वेंटी विश्वचषकाचे थेट ऑस्ट्रेलियातून वृत्तांकन केले होते. यंदाच्या विश्वचषकात दै. 'पुढारी'तील स्तंभलेखनाबरोबरच 'पुढारी न्यूज' वाहिनीवरही सामन्यांच्या घडामोडींचा आढावा ते घेणार आहेत.