नाशिक : पुढारी वृत्तसेवा
धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभलेली गोदावरी नदी सांडपाण्याचे नाले, गटारींमुळे प्रदूषित होऊन 'आयसीयू'त पोहोचली आहे. मातेसमान गोदावरीला प्रदूषणाच्या जीवघेण्या आजारापासून मुक्त करण्यासाठी नदीपात्रात सांडपाणी मिसळू न देणे हा एकमेव पर्याय असून, मलनिस्सारण केंद्रांतून बाहेर पडणार्या प्रक्रियायुक्त पाण्याचा शेती, उद्योग, औष्णिक विद्युत केंद्रासाठी पुनर्वापर करावा. अधिक बीओडी असलेले प्रक्रियायुक्त सांडपाणीदेखील नदीपात्रात सोडले जाणार नाही यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने सत्वर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौर्यावर आलेल्या राजेंद्रसिंह यांनी गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणपातळीची सद्यस्थिती आणि नाशिक महापालिका आणि नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नदी प्रदूषणमुक्तीसाठी केल्या जाणार्या उपायययोजनांचा आढावा घेतला.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, राष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विनोद बोधनकर यांच्यासह पोलिस, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी आणि प्राजक्ता बस्ते, राजेश पंडित, निशिकांत पगारे, देवांग जानी आदी पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीच्या कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास प्रकल्प, होळकर पुलाखाली बसविण्यात येणारे अत्याधुनिक गेट, गोदापात्रातील गाळ काढणे, नमामि गोदा प्रकल्पांतर्गत प्रस्तावित मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ आणि नदीपात्रात मिसळणार्या सांडपाण्याच्या गटारी रोखण्यासाठी नव्या मलवाहिकांच्या जाळ्यांची निर्मिती याविषयी स्मार्ट कंपनीचे सीईओ मोरे, मनपाचे शहर अभियंता नितीन वंजारी यांनी माहिती दिली.
पूररेषेतील बांधकामे आधी रोखा…
नदीपात्रातील गाळ काढल्याने पूरप्रभाव कमी झाल्याचा आश्चर्यकारक दावा स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी केला. नदीच्या पूररेषेची दर सहा वर्षांनी पुर्नआखणी करण्याची गरज असल्याचे अधिकार्यांनी सांगितले असता त्यावर राजेंद्रसिंह यांनी अधिकार्यांची कानउघाडणी करत पूररेषेतील बांधकामे रोखण्याची सूचना केली. तसेच नदीची पूररेषा 100 वर्षांहून अधिक काळ कायम असते त्यात बदल होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
अधिकार्यांकडून दिलगिरी व्यक्त…
सरस्वती नाल्याचे नदीपात्रात मिसळणारे पाणी बंद करून मलनिस्सारण केंद्राला जोडण्यात आले असून, पावसाळ्यात उदभवणारी ओव्हरफ्लोची परिस्थिती रोखण्यासाठी सरस्वती नाल्याचे रुंदीकरण होणे गरजेचे असल्याचे स्मार्ट अधिकार्यांकडून सांगण्यात आले. सरस्वती नाला नव्हे तर नदी असल्याची आठवण अधिकार्यांना करून दिली असता कंपनीच्या अधिकार्यांनी दिलगिरी व्यक्त