नाशिक : पालिकेच्या श्वान निर्बीजीकरण केंद्रात गंभीर त्रुटी

श्वान निर्बिजीकरण
श्वान निर्बिजीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या पथकाने महापालिकेच्या विल्होळी भागातील श्वान निर्बीजीकरण केंद्राच्या अचानक केलेल्या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भातील अहवाल समितीने आयुक्तांना सादर करत त्रुटींबाबत तत्काळ उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

मनपातील श्वान निर्बीजीकरणाचा ठेकादेखील नेहमीच वादात राहिलेला आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण यावे, यासाठी मनपामार्फत श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. त्यासाठी विल्होळी भागात मनपाने निर्बीजीकरण केंद्र थाटले आहे. मोकाट कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मनपाने 'शरण्या वेल्फेअर' या संस्थेला ठेका दिलेला आहे. गेल्या आठ वर्षांत सुमारे 80 हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. असे असले तरी शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येऊ शकलेले नाही. आजही शहरातील विविध भागांतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कामगार, कर्मचार्‍यांनादेखील कामावरून ये-जा करताना रस्त्यातील कुत्र्यांशी सामना करावा लागतो. याबाबत मनपाच्या निर्बीजीकरणाविरोधात पर्यावरणप्रेमींनी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी या शासकीय समितीकडे तक्रार केली होती.

अशा आढळल्या त्रुटी …
कुत्र्यांचे योग्य प्रकारे निर्बीजीकरण केले जात नाही. निर्बीजीकरण केंद्र परिसर तसेच वॉर्डात अस्वच्छता. दप्तर तपासणीतही अनेक त्रुटी समोर. औषधसाठ्याबाबत अपूर्णता. निर्बीजीकरण रजिस्टर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर श्वान पुन्हा मूळ जागेत सोडणे, शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू, यासंदर्भातील नोंदी नाहीत.

आयुक्तांच्या इशार्‍यानंतरही कार्यवाही नाहीच…
मोकाट कुत्रे पकडणे आणि निर्बीजीकरण याबाबत आयुक्तांकडे अनेक तक्रारी प्राप्त होऊनही आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ठोस अशी कारवाई केली नाही. पशुसंवर्धन खात्याचे डॉ. प्रमोद सोनवणे यांना केवळ ठेका रद्दचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर मात्र काहीही कार्यवाही झाली नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news