नाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार | पुढारी

नाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील पोलिस अधीक्षक, उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर शहरातील तीन पोलिस उपआयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार नव्याने आलेल्या तिन्ही उपआयुक्तांनी पदभार स्वीकारला असून, त्यांना नवीन जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यानुसार किरणकुमार चव्हाण परिमंडळ एक, चंद्रकांत खांडवी परिमंडळ दोन तर प्रशांत बच्छाव हे गुन्हे उपआयुक्तपदी रुजू झाले आहेत.

गेल्या आठवड्यात गृह विभागाने राज्यातील १०४ पोलिस अधीक्षक व उपआयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार नाशिकचे उपआयुक्त अमोल तांबे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अधीक्षकपदी नियुक्ती झाली. संजय बारकुंड यांची धुळे अधीक्षकपदी तर, उपआयुक्त विजय खरात यांची मुंबईत दक्षता विभागाच्या सहायक महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांची नागपूर लोहमार्ग विभागात बदली करण्यात आली. या सर्व अधिकाऱ्यांनी पदभार सोडल्यानंतर नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. फोर्स वन येथून बदलून आलेले उपआयुक्त किरणकुमार चव्हाण हे परिमंडळ एकचे कामकाज पाहत आहेत. तर, मालेगावच्या अपर अधीक्षकपदाची जबाबदारी पाहून आलेल्या खांडवी यांच्याकडे परिमंडळ दोनचा आणि धुळ्याचे अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुन्हे उपआयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधकची खुर्ची रिक्त : गृहविभागाने नाशिकच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी गृह विभागाने त्यांची जुनीच जबाबदारी कायम ठेवत त्यांना रुजू न होण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी कोणाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे या पदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हा चर्चेचा विषय आहे.

हेही वाचा:

Back to top button