नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघातर्फे सोमवारी (दि.14) नाशिकमध्ये दीपावली स्नेहमिलन आयोजित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
आडगाव नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये सायंकाळी 5 ला बहुभाषीय ब्राह्मण स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी पंचवटीमधील शुक्ल यजुर्वेदिय संस्थेमध्ये शनिवारी (दि.12) पत्रकार परिषद पार पडली. संमेलनाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी अधिक माहिती देताना कोरोना संकटानंतर सर्वशाखीय ब्राह्मण समाजाला एका व्यासपीठावर एकत्रित आणण्यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात ब्राह्मण समाजातील सर्वशाखीयांमध्ये सुसंवाद घडविताना समाजाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे शुक्ल यांनी सांगितले. संमेलनात प्रसिद्ध शास्त्रज्ञ विश्वास साक्रीकर आणि अॅड. अविनाश भिडे सहभागी होणार आहेत. अॅड. भिडे हे समाजातील 'तरुणांच्या कथा आणि व्यथा' विषयावर मार्गदर्शन करणार असल्याचे भगवंत पाठक यांनी सांगितले. अॅड. भानुदास शौचे यांनी संमेलन आयोजनाचे महत्त्व विशद करताना ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासह शासन दरबारी समाजाच्या मागण्या, विद्यार्थी प्रश्नांबाबतचे ठराव मांडण्यात येणार आहेत. यावेळी योगेश बक्षी, चंद्रशेखर जोशी, संदीप जोशी, प्रदीप भानुवंशी, महेश शुक्ल, राजू व्यास आदी उपस्थित होते.