कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांची बुद्धी शरद पवारांनी भ—ष्ट केली – चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या अडीच वर्षांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ—ष्ट केली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या विचारांचा विसर पडल्याचा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.

अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप करणार्‍यांनी अडीच वर्षांत काय केले, असा सवाल करून बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या भीतीने 18 महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रधान सचिवांना चार तास वेटिंग करावे लागायचे. अशावेळी ते उद्योगपतींना कसे भेटणार? त्यामुळे कोणत्याही उद्योगांबाबत चर्चा, बैठक, नियोजन केले नाही; मग उद्योग महाराष्ट्रात कसे राहणार? ऊर्जा प्रकल्पाबाबतही 22 जून 2022 पर्यंत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करायचा होता. तेव्हा
महाविकास आघाडी सरकार होते. त्या सरकारने पाठपुरावा केला नाही. फडणवीस-शिंदे सरकार 30 जून रोजी सत्तेवर आले; मग या सरकारवर आरोप का करता, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेत्यांसह त्यांच्या मुलांकडून भारत जोडो यात्रा हायजॅक

भाजपच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने केलेल्या कामगिरीमुळे विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपकडे येत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, एकीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरू असताना काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. भारत जोडो यात्रा नेते आणि नेत्यांच्या मुलांनी हायजॅक केल्याने सामान्य कार्यकर्त्यांना संधी नाही, त्यामुळे हजारो कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळेच नंदुरबार, मीरा-भाईंदर, ठाणे या ठिकाणी हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहेत. सातारा जिल्ह्यात 1 हजार 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीने सरकार हायजॅक केले

डिसेंबरच्या 18 तारखेपर्यंत राज्याचा दौरा पूर्ण करून प्रत्येक जिल्ह्यात काय अपेक्षा आहेत, याचा लेखाजोखा तयार करून सरकारशी समन्वयातून अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या समस्या आहेत. तेथील प्रश्न काय आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. गेल्या अडीच वर्षांत काँग्रेस पक्षातील नेत्यांना मोठे करण्यासाठी सरकार स्थापन झाल्याचा आरोप करून ते म्हणाले, उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच वर्षे सरकारच हायजॅक केले होते.

महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत

2024 मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाहीत. त्यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ येईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागांचे ध्येय भाजपने ठेवले आहे. जेथे भाजपचा उमेदवार प्रबळ आहे, तेथे इतर पक्षांतील लोकांना संधी मिळणार नाही. मात्र, 51 टक्क्यांचे ध्येय गाठण्यासाठी काही ठिकाणी हा फॉर्म्युला बदलावा लागेल. जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचे त्यांनी समर्थन केले.

राज्य सरकार खंबीर

आपले शिल्लक राहिलेले नेते, कार्यकर्ते फुटून जाऊ नयेत म्हणून सरकार पडणार, अशी विधाने केली जात आहेत. अनेकांना सत्तेशिवाय करमत नाही, असे सांगून ते म्हणाले की, हे सरकार पडणार नाही. बहुमत सिद्ध करण्यासाठी आजही आम्ही तयार आहोत, असे आव्हान त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले. एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण कायम राहील, असा दावा करून बावनकुळे म्हणाले, कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाची कारमीमांसा करताना पक्षातील काही त्रुटी दिसल्या असून, त्या दूर केल्या जातील. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा आणि शिवसेनेच्या विचारांचा विसर पडला आहे. त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारला आहे. आता केवळ काँग्रेस पक्षाची घटना हातात घ्यायचे शिल्लक आहे. शिवसैनिकांत प्रचंड अस्वस्थता आहे, म्हणूनच शिवसैनिक ठाकरे यांना सोडून जात आहेत. अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाची आहे. या तिन्ही पक्षांतील सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार जनतेस आपले वाटते. महाविकास आघाडीने केवळ अहंकारामुळे गेल्या अडीच वर्षांत केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविल्या नाहीत. त्यामुळे जनतेचे नुकसान झाले, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news