नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक जिल्हा सर्व प्रकारच्या पर्यटनात आघाडीवर आहे. धार्मिक पर्यटन म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याने आता साहसी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि कृषी पर्यटनातही आपली छाप पाडली आहे. जिल्ह्यात येणारा एक पर्यटक तब्बल 80 लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी अर्थचक्राला गती देण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य येथे पर्यटन संचालनालय व वनविभाग आयोजित पक्षी महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, सहायक वनसंरक्षक विक्रम आहिरे, डॉ. सुजित नेवसे, वनक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, चापडगाव वन समितीच्या अध्यक्षा सुनीता दराडे आदी उपस्थित होते.
जगभरातील प्रदूषणाचा मोठा फटका पक्ष्यांच्या अधिवासाला बसत आहे. त्यामुळे हजारो किलोमीटर प्रवास करून हे पक्षी नांदूमध्यमेशर येथे येत असून त्यांचे संवर्धन करायला हवे. नांदूरमध्यमेश्वर येथेही पर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण झाल्याने या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. अभयारण्यातील काही सुविधा आवश्यक असतील, तर त्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री भुजबळ यांनी दिली. पर्यटनाने माणूस जुन्याचा नवा होतो त्यामुळे आयुष्याचे काही क्षण पर्यटनाला देऊन स्वतःला रिचार्ज करावे. नाशिकमध्ये येणारे पर्यटक जास्त दिवस थांबावेत या द़ृष्टीने पर्यटनाचा विकास करण्याची आवश्यकता आहे, असे ना. भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्री भुजबळ यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. तसेच इकोफ्रेण्डली टॅटू आपल्या हातावर काढून घेतले.
विजेत्यांचा सन्मान
वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम पारितोषिक डॉ. जयंत फुलकर, द्वितीय चारुहास कुलकर्णी, तृतीय ओमकार चव्हाण व उत्तेजनार्थ रोशन पोटे व विशेष पारितोषिक आनंद बोरा यांना देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार शिरीष क्षीरसागर यांनी काम पाहिले.