जोखीम कमी करणारा ‘एसटीपी’ | पुढारी

जोखीम कमी करणारा ‘एसटीपी’

म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एसआयपीची पद्धत लोकप्रिय मानली जाते. त्यामुळे एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) तसेच एसडब्ल्यूपी (सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन)बाबत सर्वच जण जाणून आहेत. परंतु सध्या सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅनची (एसटीपी)देखील गुंतवणूकदारांत चर्चा आहे. या प्लॅनचा लाभ घेऊन आपण गुंतवणुकीचे अपेक्षित फळ पदरात पाडून घेऊ शकता.

कोरोना काळानंतर शेअर बाजाराने विक्रमी उंची गाठली. परंतु रशिया-युक्रेनच्या युद्धाने बाजार पुन्हा गटागंळ्या खात आहे. बाजार आपल्या उच्चांकी पातळीपासून पाच ते सहा हजार निर्देशांकाने खाली आला आहे. बाजारातील या चढउतारामुळे गुंतवणूकदारदेखील धास्तावले आहेत. बाजारात थेट गुंतवणूक करण्याचे काही जण टाळत आहेत. त्यामुळे ते म्युच्युअल फंडकडे वळत आहेत. यासाठी एसआयपी हा एक चांगला पर्याय सांगितला जातो. परंतु अनेक गुंतवणूकदार एसटीपी म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्स्फरच्या माध्यमातून गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

शेअर बाजारातील तेजी-मंदीवर मात करून फायदा घेण्यासाठी आणि आपल्या गुंतवणुकीतील बाजार जोखीम कमी करण्याचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी म्युच्युअल फंडात एसआयपी आणि एसटीपी या दोन प्रकारे गुंतवणूक पद्धती उपलब्ध आहेत. या दोन्ही पद्धतीचा वापर कसा करावा त्यासाठी या पद्धती कशा काम करतात, ते आधी पाहू.

एसआयपी आणि एसटीपी : मूलभूत फरक

एसआयपी म्हणजे नियमित गुंतवणूक पद्धत. एखादा आपल्या बँक खात्यातून दरमहा एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेत सातत्याने गुंतवणूक करत असते. एसटीपी नियमित वर्गपद्धतीमध्ये आपल्या बँक खात्यातून नाही, तर म्युच्युअल फंड मधील एका योजनेतून दुसर्‍या योजनेत दिलेल्या सुचनेनुसार ठराविक काळात ट्रान्स्फर होत असते. बाजारातील तेजी-मंदीच्या धोरणावर मात करून योग्य सल्ल्याने गुंतवणुकीचे नियोजन केल्यास बाजारापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे परतावा मिळविता येतो.

म्युच्युअल फंडात वेगवेगळ्या मालमत्तेमधील योजनेच्या उद्देशानुसार दोन हजारांहून अधिक योजना आहेत. प्रामुख्याने डिबेट फंड आणि इक्विटी फंड असे दोन प्रकार पाहावयास मिळतात. डिबेट फंड म्हणजे आपला पैसा कर्जासाठी वापरला जातो. ही गुंतवणूक सुरक्षित असते; मात्र इथे व्याजदराची जोखीम असते. त्याच्या उलट इक्विटी योजनेतील रक्कम ही निरनिराळ्या व्यवसायात म्हणजेच विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. इथे जोखीम जास्त असते. रोजच्या शेअर मार्केट चढउतारानुसार गुंतवणूक मूल्य कमी जास्त होते.

गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळविण्यासाठी बाजारातील मंदीमध्ये गुंतवणूक करून तेजीमध्ये गुंतवणूक काढून घेणे अधिक शहाणपणाचे ठरते. बाजारातील चढउतारावर मात आणि जोखमीचे प्रभावी व्यवस्थापन करून अधिक चांगला परतावा मिळण्यासाठी एसआयपी आणि एसटीपीची कार्यपद्धती समजून घेणे गरजेचे आहे.

एसटीपी सिस्टेमेटिक ट्रान्स्फर प्लानद्वारे आपण म्युच्युअल फंडातील रक्कम एका योजनेतून दुसर्‍या योजनेत रक्कम वर्ग करू शकतो. आपण केलेल्या गुंतवणुकीमधील बाजार जोखीम कमी करून आपला पोर्ट फोलिओ रीबॅलन्सिंग करण्यासाठी या पद्धतीचा फार चांगला उपयोग होतो. एकदा सूचना दिली की, त्या योजनेतील रक्कम संपेपर्यंत वरीलप्रमाणे रक्कम हस्तांतरित होत असते.
एसटीपीच्या तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास, ज्या फंड योजनेतून रक्कम वर्ग करावयाची आहे, त्याला सोर्स फंड मानला जातो; तर या फंडातून ज्या योजनेत पैसे टाकायचे आहेत, त्यास टार्गेट फंड असे म्हणतात.

एसटीपीची वैशिष्ट्ये

एसटीपीने दररोज, दर आठवडा, पंधरावडा, महिना, तिमाही किंवा सहामाही अशा ठराविक काळात दिलेल्या सूचनेनुसार नियमितपणे आपली गुंतवणूक एकातून दुसर्‍या योजनेत वर्ग करता येते. यामध्ये किमान आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. एसटीपी करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.
एका फंडातून दुसर्‍या फंडात जेव्हा रक्कम ट्रान्स्फर होते, तेव्हा फंडला रिडेम्पशन आणि नवीन गुंतवणूक मानली जाते. त्यासाठी निगडित योजनेचे इंट्री किंवा एक्झिट लोड पाहणे गरजेचे असते.
रिडेम्पशनच्या नियमानुसार डिबेटमधील पहिल्या तीन वर्षांच्या आत पैसे ट्रान्स्फर केल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर आकारला जातो. तीन वर्षांनंतर इंडेक्शेशन बेनिफिट मिळतो. आणि इक्विटीमध्ये एक वर्षाच्या आत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कर आकारला जातो आणि एक वर्षानंतर एक लाखावरील झालेल्या नफा यावर 10% कर द्यावा लागतो. रुपयाचे सरासरी मूल्य लाभते. डिबेट योजेतून इक्विटीत एसटीपी दिले तर बाजारातील चढउतारानुसार कमी आणि चढ्या दराने युनिट खरेदी होऊन रुपयाची सरासरी किमत कमी होऊन चांगला फायदा होतो.

एसटीपी तीन प्रकारे देता येते

फिक्स्ड एसटीपी- ठराविक रक्कम ठराविक काळाने वर्ग करता येते. कॅपिटल अ‍ॅप्रीसिएट -आपण केलेली गुंतवणूक तशीच ठेवून त्या गुंतवणुकीवर जितकी वाढ मिळाली आहे तितकीच रक्कम दुसर्‍या योजनेत वर्ग केली जाते. फ्लेक्सी एसटीपी – याठिकाणी वर्ग करणार्‍या रकमेमध्ये कमी अथवा जास्त अशी ठरवू शकतो. बाजारात तेजी आहे आणि मंदी येणार आहे अशी शक्यता असेल, एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल, तर एसटीपीच्या माध्यमातून डिबेट फंडातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करावी.

उदा. जानेवारी महिन्यात इक्विटी मार्केट अतिउच्च पातळीवर गेले होते. अशा वेळी आपण प्रॉफिट बुकिंग केले पाहिजे. इक्विटी योजनेतून बाहेर पडून डेब्ट फंडात आले पाहिजे. आणि नंतर परत एकदा एसटीपी ने डिबेट फंडातून इक्विटी योजनेत दर आठवड्याला ठराविक रक्कम वर्ग करणे गरजेचे होते. शेअर बाजार अतिउच्च पातळी वर नफा मिळवून आणि नंतर सिस्टेमेटिक ट्रान्स्फर प्लान हळूहळू इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. बाजारातील चढउतार आणि तेजी-मंदीवर मात करून आपला गुंतवणूक पोर्टफोलिओ रीबॅलन्सिंग करण्याचे हे कौशल्य प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.

-स्वाती देसाई

Back to top button