भविष्य निधीसाठी जीवन प्रमाणपत्र सादर केले ना? | पुढारी

भविष्य निधीसाठी जीवन प्रमाणपत्र सादर केले ना?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र (हयातनामा) दाखल करण्याबाबत मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन स्किम 95 (ईपीएस 95) चे निवृत्तीवेतनदार व्यक्ती आता आपला हयातनामा कधीही जमा करू शकतो.

निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी संबंधितांना मुदतीत जीवन प्रमाणपत्र जमा करणे गरजेचे आहे. नियमानुसार एखाद्या इपीएस लाभार्थी निवृत्तीवेतनदाराने 15 नोव्हेंबर 2021 रोजी जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल, तर त्यास 15 नोव्हेंबर 2022 च्या अगोदर प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अशी कृती न केल्यास पेन्शन रोखली जाईल. निवृत्तीवेतन सुरू राहण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी निश्चित वेळेच्या आत जीवनप्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. शेवटच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र सादर करू शकले नाही, तर पुढील महिन्यांपासून पेन्शन मिळणार नाही.

ईपीएफओने काय सांगितले?

ईपीएफओने म्हटले की, ईपीएस 95 निवृत्तीवेतनधारकांनो, आपल्या जीवन प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी संपला आहे का? आपण केव्हाही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. जमा करण्याच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत प्रमाणपत्राचा कालावधी ग्राह्य धरला जाईल. कर्मचारी पेन्शन स्कीम 1995 नुसार दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपासून एक वर्षात जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.

या ठिकाणी जमा करा

इपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून म्हटले की, इपीएस 95 निवृत्तीवेतनधारक हे ठिकठिकाणी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
निवृत्तीवेतनधारक जीवन प्रमाणपत्र जारी करणारे बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर, भारतीय पोस्ट पेमेंट बँक, पोस्ट ऑफिस, उमंग अ‍ॅप, इपीएफओचे कार्यालय आदी ठिकाणी हयातनामा सादर करू शकतील. पेन्शनधारक हे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही मार्गाने हयातनामा सादर करू शकतात. एसबीआय आणि पीएनबीसारख्या सरकारी बँका जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी डोअर स्टेप सुविधा प्रदान करतात.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आपल्याला पेन्शन पेमेंट ऑर्डर नंबर (पीपीओ), आधार नंबर, बँक खात्याची माहिती आदी असणे गरजेचे आहे. आधार लिंक्ड मोबाईल नंबर असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

Back to top button