धुळे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या सप्तशृंगगडावरील देवीचा यात्रोत्सव यंदा उत्साहात पार पडला. यामध्ये राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. संपामुळे बंद असलेल्या लालपरीद्वारे धुळे जिल्ह्यातून ८२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे यांनी दिली.
आदिशक्ती श्री सप्तशृंगीच्या उत्सवासाठी धुळे जिल्ह्यातून तसेच खानदेशातून दरवर्षी हजारो भाविक हजेरी लावतात. पायी जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील लक्षणीय असते. प्रकृतीच्या कारणामुळे भाविकांना लालपरीचा आधार असतो. या माध्यमातून राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला उत्पन्नाचा स्रोत मिळतो. तसेच प्रवाशांनादेखील सुरक्षितपणे गडावर दर्शनाचा लाभ घेता येतो. यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या २०७ बसेसच्या माध्यमातून सुमारे ८२ हजार प्रवाशांना सेवेचा लाभ घेता आला. यासाठी एसटी महामंडळाला १,३०३ फेऱ्या कराव्या लागल्या, तर सुमारे २ लाख २७ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यात आला. यात्राेत्सवाच्या माध्यमातून धुळे विभागाला सुमारे १ कोटी १२ लाख ७२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच हे उत्पन्न मिळाले असून, कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळे विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. मात्र, सेवेत हजर झालेल्या चालक-वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन उत्सवाच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळेच महामंडळाला वाढीव उत्पन्न मिळाले आहे. – मनीषा सपकाळे, विभाग नियंत्रक
हेही वाचा: