देशात कायद्याचे राज्य आहे असे वाटत नाही; ‘बुलडोझर’वरून काँग्रेसचा मोदी सरकावर बोचरा वार | पुढारी

देशात कायद्याचे राज्य आहे असे वाटत नाही; 'बुलडोझर'वरून काँग्रेसचा मोदी सरकावर बोचरा वार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : जहांगीरपुरी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे आणि त्यानंतर बुलडोझरने अतिक्रमण हटवल्याने संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी जहांगीरपुरीतील अतिक्रमण बुलडोझरने हटवण्यात आले. मात्र, याचा फटका अनेक कुटुंबांना बसला.

विरोधकांनी यावरून कडाडून प्रहार केला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जहांगीरपुरीला भेट दिली. यावेळी अजय माकन यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. अजय माकन म्हणाले की, देशात कायद्याचे राज्य आहे असे वाटत नाही. नोटीस न देता कोणाचे घर पाडण्याची परवानगी कायदा देत नाही.

अजय माकन पुढे म्हणाले की, माझ्याकडे २०१९ च्या न्यायालयाचा आदेशही आहे, ज्यामध्ये कोणालाही नोटीस दिल्याशिवाय त्यांचे घर पाडता येणार नाही, असे म्हटले आहे, मग काल येथे असे का झाले? ते म्हणाले की मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की कृपया या प्रक्रियेकडे धर्माच्या नजरेतून पाहू नका. ही फक्त गरिबांच्या पोटावर लाथ मारली गेली आहे. आपल्या देशात बेरोजगारी-महागाईचा सर्वाधिक फटका गरिबांना बसत असल्याने त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवून धर्माच्या नावाखाली फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

दुसरीकडे, इम्रान प्रतापगढ़ी म्हणाले की, काल ज्या प्रकारे सरकारी छळवणूक झाली त्याविरोधात आम्ही आज पीडितांना भेटणार आहोत आणि परत जाऊन सोनिया गांधींना अहवाल देऊ आणि त्यानंतर पक्ष पुढील कारवाई करेल.

पक्षाचे दिल्लीचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी भाजपवर निशाणा साधत महागाईवरून लक्ष वळवण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहिमेचे नाटक करण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जहांगीरपुरीला का गेले नाहीत, असा सवाल दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार यांनी केला. बुलडोझर चालवणे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button