नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत वारंवार नागपुरला आले तर त्यांना थोडी सुबुद्धी मिळेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरूवारी माध्यमांशी बोलताना लगावला.
संजय राऊत हे नागपूरवर विशेष लक्ष देत आहेत. ते वारंवार येथे येत आहेत याविषयी विचारले असता फडणवीस यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. नागपूरच्या वातावरणात तसेच मातीमध्ये एक वेगळेपणा आहे. त्यामुळे ते नागपूरला वारंवार आले तर थोडी सुबुद्धी येईल, असे ते म्हणाले.
अचलपूर दंगलीत भाजप शहराध्यक्षाला उचलून नेण्यात आले याबाबत विचारले असता, अमरावती जिल्ह्यांत ब्रिटिशांप्रमाणे पोलिसांचे राज्य आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. विशेषत: सरकारचे मंत्रीच तिथे संपर्कात असल्याने परिस्थिती अधिक वाईट होत आहे. त्यामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहात आहेत. त्याचे एकमेव कारण पोलिस आणि सरकार यांची प्रतिक्रिया असल्याचे फडणवीस म्हणाले. विशेषत: हिंदू समाजाला ठरवून टारगेट केले जात आहे. अमरावती जिल्ह्यात यामुळे तणाव वाढत आहे. पोलिसांनी जात, धर्म न पाहाता काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
भाजपाच्या पोलखोल आंदोलनात तोडफोड झाली. तिथे कोणालाही अटक झालेली नाही. आम्ही रोज पोलखोल करीत आहोत. त्यामुळे अस्वस्थ होत असलेले आमच्या रथावर हल्ले करीत आहेत. त्यांनी कितीही हल्ले केले तरी पोलखोल थांबणार नाही. आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण दिले तर पोलिसांची पोलखोल केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचलंत का?