नाशिक : मांडव उतरवून अल्पवयीन बहिणींचा विवाह रोखला, ‘या’ गावातील घटना | पुढारी

नाशिक : मांडव उतरवून अल्पवयीन बहिणींचा विवाह रोखला, 'या' गावातील घटना

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा ; एकात्मिक बालविकास विभाग, पोलिस यंत्रणा बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नात आहे. मंगळवारी (ता.१९) येथील गावात दोन अल्पवयीन बहिणींचा विवाह लागणार असल्याच्या माहितीवरून बालविकासच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामविकासाच्या सहकार्याने बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे.

त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील बालविवाह रोखण्याची तिसरी घटना घडली आहे. गेल्या महिन्यात दि. २५ मार्चला दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलीसह तिच्या कुटुंबीयांची समजूत घालत एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे यांनी बालविवाह रोखला. त्यानंतर दि. १७ एप्रिलला घोटी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधहास आणि गेजगे यांनी दुसरा बालविवाह रोखला. तर देवगावमध्ये दोन बहिणींचा बालविवाह होत असल्याच्या माहितीवरुन गेजगे यांनी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांना विवाह होणाऱ्या ठिकाणी कुटुंबाकडे पाठवले. तसेच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य दिले. बहिणींचा एकाच मांडवात बालविवाह होत असल्याचे माहित झाल्यावर मांडव उतरवून विवाह राेखण्यात आला. तर त्या दोघींच्या थोरल्या बहिणींचा विवाह झालेला आहे.

वास्तविक कुपोषित बालकांची आई १५ ते १६ वयोगटातील असते. तिला स्वतःची काळजी घेता येत नाही. तर तिला बाळ कसे सांभाळता येणार ? त्यामुळे बालविवाह सारख्या प्रथा, अंधश्रद्धा यांच्या आहारी जाऊ नका. कुपोषित बालकांना रुग्णालयात दाखल केल्यास मातांना बाळासह बुडीत मजुरी व आहारही मिळतो. शासनाच्या सवलतीचा लाभ घ्या, पण विवाह मात्र सज्ञान झाल्यावरच करा. – भारती गेजगे, महिला बालविकास अधिकारी.

हेही वाचा :

Back to top button