नाशिक : वणी येथे बेशिस्त वाहतूक, पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण

वणी : कळवण रस्त्यावर उभ्या असलेल्या बेशिस्त गाड्या.  (छाया : अनिल गांगुर्डे)
वणी : कळवण रस्त्यावर उभ्या असलेल्या बेशिस्त गाड्या. (छाया : अनिल गांगुर्डे)

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
शहरात तसेच परिसरात बेशिस्त वाहतूक व मनमानी पार्किंगमुळे अनेक ठिकाणे अपघातप्रवण ठरत आहेत. वणी शहरातून सप्तशृंगगड तसेच गुजरात राज्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने आधीच या मार्गावर वर्दळ अधिक असते. त्यात रस्त्याच्या कडेलाच होणार्‍या वाहनाच्या पार्किंगमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

वणी-कळवण रस्त्यावरील पुलापासून ते कला व वाणिज्य महाविद्यालयापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने मालवाहतूक करणार्या गाड्या रस्त्याच्या कडेलाच उभ्या केल्या जातात. त्यामुळे शहरातून बाहेर पडताना समोरील वाहने दिसत नाहीत. साईमंदिराकडून वाहनामुळे रस्ता समजून येत नाही. त्यातूनच अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. याच रस्त्यावर महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी येतात. त्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. शहरात रस्त्यांच्या कडेला अनेक दुकाने असल्याने या दुकानांत येणारे ग्राहकदेखील रस्त्याच्या कडेलाच आपली वाहने अस्तव्यस्त उभी करतात. त्यामुळे येथून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. या प्रकाराकडे पोलिस यंत्रणेचे कोणतेही लक्ष नसल्याने शहरात वाहतूक आणि पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. याबाबत पोलिस व ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेऊन शिस्त लावण्याची गरज आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news