नाशिक : भाजप, हिंदू संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा | पुढारी

नाशिक : भाजप, हिंदू संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल माध्यमातून हिंदू देवतांबाबत आक्षेपार्ह मजकूर पसरविणार्‍या संशयित आरोपीस तत्काळ अटक करावी. याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना मंगळवारी (दि. 7) निवेदन देत संशयितांवर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा राज्यभरात मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आला.

गेल्या महिन्यात वडाळा गावातील एका युवकाने सोशल माध्यमातून हिंदू देवतांबद्दल अक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. या घटनेनंतर या युवकावर गुन्हा दाखल करण्यापलीकडे कोणतीच कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दोन धर्मांत शत्रुत्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याबाबत माहिती असूनदेखील इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापलीकडे कोणतीच कारवाई झाली नसल्याबद्दल उपस्थितांनी रोष व्यक्त केला. तसेच गृहमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताना संशयिताला अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. बी. डी. भालेकर मैदान, शालिमार, प. सा. नाट्यगृह, एमजी रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चात आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, हेमंत शेट्टी, मुकेश शहाणे, पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू, अनिकेतशास्त्री देशपांडे, समाधान आहेर, आकाश बेग, सागर बेग, सचिन गुरकुले, मनोज राजवाडे, गजू घोडके यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. मोर्चामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

निषेधाच्या फलकांनी वेधले लक्ष
मोर्चेकर्‍यांनी ‘जय श्रीराम’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. तसेच हिंदू देवतांची विटंबना करणार्‍यांचा निषेध, हिंदूविरोधी तिघाडी सरकारचा जाहीर निषेधाच्या फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चात बहुजन रयत परिषद, राष्ट्रीय श्रीराम संघ, जय मल्हार क्रांती संघटना, लव्ह जिहाद संघर्ष समिती व श्री शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा :

Back to top button