नाशिक : मुसळगावपाठोपाठ मानोरीतही शेतकर्‍यांचा नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत विरोध | पुढारी

नाशिक : मुसळगावपाठोपाठ मानोरीतही शेतकर्‍यांचा नाशिक-पुणे रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत विरोध

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासाठी शासन स्तरावरून जमिनी अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी शेतकरी जमिनी देत आहेत, तर काही ठिकाणी या प्रकल्पाला शेतकर्‍यांनी तीव्र स्वरूपाचा विरोध दर्शविला आहे. तालुक्यातील मानोरी येथे शेतकर्‍यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकर्‍यांनी एकत्रित येत नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रुकप्रमाणे जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा, अशी मागणी केली.

यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, रेल्वे प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदने देऊन समस्या मांडल्या आहेत. मानोरी भागातील जमिनी बागायत क्षेत्रात येत असून, काही शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्यामुळे बहुतांश शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना पुढील जीवन जगण्याचे साधन नसल्यामुळे या प्रकल्पामध्ये ज्या-ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरीमध्ये सामावून घ्यावे. त्यांचा संसार उघड्यावर पडू देऊ नये, अशी चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने ठरावही तयार करण्यात आला. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत एक इंचही जमीन रेल्वे प्रकल्पाला दिली जाणार नाही. आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत, असे शेतकरी वर्गाने सांगितले. शासनस्तरावरील दर अत्यल्प आहेत. शासनाने सर्वांना समान मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी लताबाई सांगळे, लक्ष्मण सांगळे, कचरू सांगळे, सोमनाथ चकोर, संतोष नागरे, शरद नागरे, फकिरा नागरे, पंढरीनाथ चकोर, कचरू नागरे, सोमनाथ चकोर, पंढरीनाथ चकोर, दिनकर चकोर, मधुकर चकोर, काजल सांगळे, निवृत्ती आव्हाड, खंडू सांगळे, नाना सानप आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पबाधित शेतकर्‍यांची संख्या 35
मानोरी भागातील जवळजवळ 35 शेतकर्‍यांच्या जमिनी या प्रकल्पात जात आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी हे भूमिहीन, तर काही शेतकर्‍यांच्या थोड्याफार जमिनी शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या सर्व शेतकर्‍यांचा एकंदरीत विचार करून लवकरात लवकर बैठक घेऊन दर निश्चिती करण्यात यावी, अशी मागणी सुखदेव साबळे, प्रभाकर सांगळे, रमेश सानप, बाळू सांगळे या शेतकर्‍यांनी केली.

हेही वाचा:

Back to top button