नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीत सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, त्यातून मखमलाबाद येथील मळे परिसरदेखील सुटलेला नाही. जुन्या चांदशी रस्ता (भगवान बाबा रोड) या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण इतके अधिक आहे, की येथून ये-जा करणे, वाहने चालविणे कठीण झालेले आहे. २५ वर्षांपूर्वी प्रशासनाने हा रस्ता केला होता. त्यानंतर अनेकदा तक्रारी करूनदेखील प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
मखमलाबाद गावाच्या काकड मळे परिसरातील जुन्या चांदशी रस्त्याचे डांबरीकरण २५ वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे. त्यानंतर आजवर या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सध्या हा रस्ता खड्डेमय झालेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा मागणी करण्यात आली असली, तरी हा रस्ता केला जात नाही. मखमलाबाद मळे परिसराचा समावेश महापालिका हद्दीत असल्याने महापालिकेचे विविध कर येथील रहिवाशांकडून वसूल केले जातात. मात्र, त्या तुलनेत सुविधा मिळत नाहीत. असे असेल, तर महापालिकेत या परिसराचा समावेश करण्याचा काय फायदा? असे प्रश्न येथील रहिवाशांकडून केले जात आहेत. अनेक वर्षांपासून येथील पथदीप बंद होते. ते सध्या सुरू करण्यात आलेले आहेत. मात्र रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्षच केले जात आहे.
मळे परिसरात पिकणारा शेतमाल काढून तो बाजारात घेऊन जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. अशावेळी रस्त्याने वाहने कशी चालवायची, असा प्रश्न चालकांना पडत आहे. अरुंद रस्ता आणि त्यात खड्ड्यांची भर यांमुळे येथील रहिवासी त्रस्त झालेले आहेत. मनपाकडून मूलभूत सुविधांमध्ये रस्त्यांची सुविधा ही मळे परिसरासाठी महत्त्वाची बाब आहे. त्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत असून, त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपदेखील परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अखेर या रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षारोपण केले. यावेळी क्रांतिवीर वसंतराव नाईक समाज विकास मंडळाचे अध्यक्ष गणपत काकड, शांताराम काकड, पुंडलिक काकड, डॉ. पुरुषोत्तम काकड, शिवाजी काकड, पंकज काकड, सचिन काकड आदी शेतकरी उपस्थित होते.
'मतदान नाही, तर समस्या सांगू नका'
या जुन्या चांदशी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. २५ वर्षांपूर्वी झालेल्या या रस्त्याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महापालिकेत कधी प्रभाग, तर कधी वाॅर्ड पद्धत होत असते. या सर्व प्रकारांतील प्रभाग पद्धतीत समस्या मांडायच्या कोणाकडे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. यापेक्षा आमची ग्रामपंचायत बरी होती. त्यातून आमच्या समस्या सुटत होत्या. तर काही लोकप्रतिनिधी हे, मतदान दुसऱ्याला करतात अन् समस्या आमच्याकडे कशाला मांडता, अशा प्रकारची उत्तरे देतात, असेही येथील त्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.