पुणे : डॉ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा’तर, अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘चैत्रबन पुरस्कार जाहीर | पुढारी

पुणे : डॉ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा’तर, अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘चैत्रबन पुरस्कार जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि चित्रकार साधना बहुळकर यांना ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. लेखक-दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘चैत्रबन’ पुरस्कार तर, युवा गायिका योगिता गोडबोले यांना ’विद्या प्रज्ञा’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी असलेल्या ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनी 14 डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता होणार्‍या कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार आणि समीक्षक सुरेश खरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी गदिमा यांच्या स्नूषा शीतल माडगूळकर यांनी लिहिलेल्या ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. उत्तरार्धात गदिमांचे बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ ’गदिमा आणि लता’ हा गदिमा गीतांचा कार्यक्रम महक संस्थेच्या मनीषा निश्चल आणि सहकारी सादर करणार आहेत, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Back to top button