नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार मागणी करूनही अद्याप खड्डे बुजविण्याचे काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी केलेले पॅचिंग पावसात वाहून गेले. नव्याने पॅचिंगसाठी एक कोटींचा निधीची आवश्यकता असून, सध्या टेंडर प्रक्रियेत रस्त्याचे पॅचिंग अडकले आहेत. शहरात रस्त्यावरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविणे आवश्यक होते. परंतु, रस्त्याच्या पॅचिंगसाठी वेळ गेला आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पॅचिंगचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर एकसारखा पाऊस सुरू झाल्याने पॅचिंगचे काम अर्धवट राहिले.
तर, दुसरीकडे मनपाच्या बांधकाम विभागामार्फत पॅचिंग केलेल्या रस्त्यावरील डांबर, खड्डी वाहून गेली. त्यात पॅचिंगचे काम अनेक दिवस बंद राहिले. पावसाळा संपल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. नागरिक रस्ता दुरुस्तीची मागणी करू लागले. तर, स्थायी समिती सभा, सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी मनपा प्रशासनाचे वाभाडे काढले. तरीही अद्यापि शहरातील रस्त्यांवर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झालेले नाही. शहरातील पॅचिंगसाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
मनपातर्फे 50 लाख रुपयाचे दोन टेंडर करण्यात आले आहेत. मात्र, अद्याप ती सर्व प्रक्रिया तांत्रिक मुद्यात अडकली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्याचे पॅचिंग करण्यासाठी दोन महिने लागण्याची शक्यता आहे.
रस्ते पॅचिंगसाठी टेंडर प्रक्रिया करण्यात आली असून, लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे पॅचिंग करण्यात येणार आहे.
– सुरेश इथापे, प्रभारी शहर अभियंता