Malegaon www.pudhari.news
Malegaon www.pudhari.news

नाशिक : विकासकामे महिनोन्महिने ‘प्रगतिपथावर’; खोदलेले रस्ते, गटार कामांनी नागरिक हैराण

नाशिक (मालेगाव): पुढारी वृत्तसेवा : शहरात रस्ते, भूमिगत गटार आदी विकासकामांचे धडाक्यात भूमिपूजन झाले. कामांना प्रारंभही झाला, मात्र तीन – चार महिने उलटल्यानंतरही कार्यस्थळी केवळ खोदकाम स्वागत करीत असल्याने वाहनधारक आणि रहिवासी हैराण झाले आहेत.

टेहरे चौफुली, डीके चौक ते चर्चगेट रस्त्याचे काम नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहात आहे. हा दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता तीन महिन्यांतही पूर्ण झालेला नाही. रस्त्यासाठी झालेल्या खोदकामावरून मार्गक्रमण करताना अंगावर काटा येतो. दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागते. दररोज 20 ते 25 लोक पडून जखमी होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. या परिसरातून नियमित प्रवास करणार्‍या वाहनधारकांचा वाहन देखभाल-दुरुस्तीचा खर्चही वाढत आहे. कोट्यवधींचे विकासकाम होत असले, तरी त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लावलेला नाही. कार्यादेश कधी झाला, किती दिवसांत काम पूर्ण होणार अन् कोण करते आहे, ही साधी माहितीही दडवली जात आहे. साधारण 12 ते 13 कोटी खर्च या रस्त्यावर होणार असल्याचे सांगण्यात येते. त्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली जाणार का, हा प्रश्नच आहे. भूमिगत गटारी टाकताना झालेल्या खोदकामानंतर रस्ते पूर्ववत केले नाहीत. त्यामुळे रस्ते फुटून चार्‍या तयार होत आहेत.

ती कामे कशी विक्रमी वेळेत होतात? : देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 किमी लांबीच्या महामार्गांची कामे विक्रमी वेळेत पूर्ण होत आहेत. मग, शहरातील कामांच्या प्रगतीची गती अशी संथ कशी, असा सवाल माजी सरपंच बापू बच्छाव यांनी उपस्थित केला आहे. उद्घाटनानंतर दीड महिन्यात कामाला सुरुवात होते. सपाटीकरणासाठी दाखल होणारे जेसीबी आठवड्याभरात गायब होतात. जलवाहिन्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होते. बंद-चालू असा खेळ सुरू असल्याने पावसाळ्यातही फुटलेल्या रस्त्यांवरूनच मार्गक्रमण नशिबी येणार काय अशी परिस्थिती आहे.

वेळेचे बंधन पाळावे : शहरातील जुना आग्रा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. त्यावरील उड्डाणपुलाचे काम होण्यास साधारण एक दशक वाट पाहावी लागेल, असे चित्र आहे. त्यापाठोपाठ सुरू झालेले काँक्रीट रस्त्याचे काम संथगतीने का होईना होत आहे. अत्यंत वर्दळ असूनही दर्जेदार काम होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्याप्रमाणे टेहरे चौफुली ते चर्चगेट रस्त्याला गती द्यावी, ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवून जलद गतीने पूर्ण करावे अन्यथा काम होत नसल्याचे सांगून बंद करावे, अशी उपरोधिक चर्चा परिसरात होत आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news