Konkan : वाईन निर्मितीला मान्यता; कोकणी मेव्याला येणार भाव | पुढारी

Konkan : वाईन निर्मितीला मान्यता; कोकणी मेव्याला येणार भाव

दापोली : प्रवीण शिंदे

वाईन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोकणात फळ हंगामाच्या शेवटी वाया जाणार्‍या आंबा, काजू बोंड, फणस, चिकू, जांभूळ, करवंद आदी फळांपासून वाईन बनविण्यास चालना मिळणार आहे. परिणामी, आपोआपच या फळांना चांगला भाव मिळणार आहे.

कोकणातील फळांना दर्जा प्राप्त व्हावा आणि यापासून फेणी, मद्य, हुराक बनविण्यास राज्य शासनाची मान्यता मिळावी म्हणून दापोली येथील संदीप राजपुरे यांनी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार संजय कदम, राज्य मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून पहिली भेट ही शरद पवार यांची घेतली होती. यावेळी राजपुरे यांनी शरद पवार यांच्याशी अर्धा तास चर्चा करून कोकणातील शेतकर्‍यांची उन्नती आणि रोजगार वाढीबाबत वाईन उद्योगाला परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.

यावेळी पवार यांनी या वाईन उद्योग परवानगीबाबत शब्द दिला होता. त्यानंतर राजपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेड दौर्‍यादरम्यान भेट घेऊन या बाबत त्यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी ना. पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा करून तत्काळ निर्णय घेऊ, अशी माहिती दिली होती. त्यानंतर राजपुरे यांनी मंत्रालयात जाऊन येथील उत्पादन शुल्क कमिशनर उमाप यांच्याशी देखील चर्चा केली होती.त्यांच्याकडूनदेखील या उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती देण्यात आली होती.

त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वाईन उद्योगाला चालना मिळावी यासाठी मंजुरी दिली आहे. या वाईन उद्योगाला परवानगी घेण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, याची देखील माहिती राजपुरे यांनी घेतली आहे. कोकणात दरवर्षी शेवटी काजूबोंड, आंबा, करवंद, जांभूळ, चिकू, फणस आदी लाखो टन फळे कुजून वाया जातात. या फळांना दर्जा प्राप्त व्हावा म्हणून राजपुरे यांनी शेतकर्‍यांची मागणी शरद पवार यांच्याकडे लावून धरली होती. ती मागणी पूर्ण झाल्याचे समाधान राजपुरे यांनी व्यक्त केले आहे. कोकणातही वाईन निर्मितीला चालना देण्याबाबत दि. 20 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे या निर्णयाचे दापोली तालुक्यातून स्वागत होत आहे.

Back to top button