पुणे : पुढारी वृत्तसेवा
थकबाकीचे पैसे न दिल्याची कारण देत, पीएमपीच्या ठेकेदारांनी शुक्रवारी अचानकच संप पुकारला. त्यामुळे ठेकेदारांच्या 700 बस जागेवरच उभ्या असून, परिणामी पुणेकरांचे प्रवासासाठी हाल होत आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2192 बस आहेत. यापैकी रोज 1400 गाड्या मार्गावर असतात. आज फक्त सातशे गाड्या मार्गावर आहेत त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, अनेक मार्गांवर गाड्या उपलब्ध होत नाहीत. प्रवाशांना आता गाडीसाठी किमान तास ते दोन तास वाट पाहावी लागत आहे.
ताफ्यातील 2000 बस गाड्यांपैकी 956 गाड्या भाडेतत्त्वावरील आहेत. त्यापैकी सातशे गाड्या आज संपात आहेत. संपात हंसा, ट्रॅव्हल टाइम्स, ओलेक्ट्रा, एम.पी. ग्रुप या ठेकेदारांनी सहभाग घेतला आहे तर बिव्हीजी, विश्वायोद्धा हे ठेकेदार संपातून अलिप्त आहेत.
संपाबाबत प्रशासनाची संपर्क साधून माहिती घेतली असता, पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतन केरुरे म्हणाल्या, ठेकेदारांनी प्रशासनाच्या विरुद्ध पुकारलेला संप असून एक दबावतंत्र आहे. आम्ही ठेकेदारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी दिला जातो का, यासंदर्भात माहिती मागितली होती. त्याचा राग मनात धरून ठेकेदारांनी आज अचानक संप पुकारला आहे.
दरम्यान, याबाबत ठेकेदारांनी "पुढारी"शी बोलताना सांगितले की, पीएमपीकडे आमची थकबाकी आहे. महापालिका आयुक्तांनी सुद्धा आमची थकबाकी देण्यासाठी पीएमपीला पैसे दिले आहेत. मात्र, पीएमपीने ते पैसे आम्हाला अजून पर्यंत दिले नाहीत. आता आमच्याकडे गाड्यांमध्ये डिझेल टाकायला देखील पैसे नाहीत. जोपर्यंत आमचे पैसे आम्हाला मिळत नाहीत, तोपर्यंत आमच्या गाड्या सुरू होणे शक्य नाही.