Nashik Accident : का घडला अपघात ? काय आढळले पाहणीत?

नाशिक ब्लॅकस्पॉट,www.pudhari.news
नाशिक ब्लॅकस्पॉट,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके
औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (दि. 8) पहाटे झालेल्या भीषण अपघातात 12 निष्पाप बळी गेले, तर 42 जण जखमी झाले. याआधीही या चौकात अनेकदा अपघात झाले असून, अनेक बळी गेले आहेत. त्यामुळे 'हॉट ब्लॅक स्पॉट' ठरलेल्या या चौकात अपघातांच्या मालिका घडूनही महापालिका, महामार्ग प्राधिकरण, शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग ढिम्म असल्याचे दै. 'पुढारी'ने केलेल्या 'ऑन द स्पॉट' पाहणीतून समोर आले.

अपघातस्थळाजवळ नेमक्या कोणत्या अडचणी आहेत व त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, याचा विचार प्रशासनाने तातडीने करून 'हॉट ब्लॅक स्पॉट'बाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, या चौकात महापालिका अथवा बांधकाम विभागाने रस्ता आणि चौक बनविताना वाहतुकीच्या व अपघाताच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नसल्याचे पाहणीत दिसून आले. सिग्नल, चौफुली बनविताना नेमका काय अभ्यास केला हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

पंचवटी : मिरची चौकात उजव्या बाजूने जय शंकर गार्डनकडे जाताना टर्निंग पॉइंटच्या मधोमध उभारण्यात आलेले व निकामी असलेले विद्युत पोल तसेच संपूर्ण चौकात रस्त्याच्या कडेला वाहनचालकांना न दिसणारी सिग्नल यंत्रणा.(छाया : गणेश बोडके)
पंचवटी : मिरची चौकात उजव्या बाजूने जय शंकर गार्डनकडे जाताना टर्निंग पॉइंटच्या मधोमध उभारण्यात आलेले व निकामी असलेले विद्युत पोल तसेच संपूर्ण चौकात रस्त्याच्या कडेला वाहनचालकांना न दिसणारी सिग्नल यंत्रणा.(छाया : गणेश बोडके)

काय आढळले पाहणीत?

रस्ता मोठा असल्याने वाहनांचा भरघाव वेग, रस्त्याच्या चहूबाजूने कुठेही डिव्हायडर, स्पीडब—ेकर नाही, वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती नाही. जवळच पेट्रोलपंप असल्याने पेट्रोल भरण्यास लोक रस्त्याच्या उलट्या दिशेने जातात. रिंगरोडवरून येणारी तसेच राज्य मार्गावरून येणारी वाहने रस्ता मोकळा असल्याने वेगाने जातात. परिणामी, चौफुलीवर कोणते वाहन कोणत्या दिशेने येत आहे, हे चालकांना लक्षात येत नाही. त्यामुळे अपघात घडतात. रस्त्याचे भूसंपादन व कागदावरील रस्ता मोठा असला तरी जागेवर पूर्णपणे रुंदीकरण झालेले नाही, रिंगरोड बनवले, मात्र चुकीच्या द़ृष्टीने व नियोजनशून्य कारभार दिसून येतो.

चौकालगत असणारे अतिक्रमण, चौकाच्या चारही रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा मधोमध नाही. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नल दिसत नाही. चौकातील रस्त्याच्या टर्निंगवर रुंदीकरण झालेले नाही. काही टर्निंगवर मधोमध महावितरण आणि महापालिका यांचे विद्युत पोल उभे केलेले आहेत. तर काही बंद व निकामी पोलदेखील आहेत. सिग्नल यंत्रणा बसविताना स्वतंत्र खांब बसविण्यात आलेले नसून स्ट्रीट लाइट व महावितरण कंपनीच्या पोलवरच सिग्नलची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाने सिग्नल यंत्रणेचे पूर्ण झालेले काम योग्यरीत्या झाले आहे की नाही, याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येते.

वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा कुठलाही विचार केलेला नसून केवळ औपचारिकता केल्याचे दिसून येते. चौकात व रस्त्यावर कोणत्याही ठिकाणी झेब—ा क्रॉसिंग (पांढरे पट्टे) मारण्यात आलेले नाहीत. चौकाच्या आजूबाजूला वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक असलेले सूचनाफलक नाहीत. यापुढेही असे अपघात होऊ नये, असे प्रशासनाला मनापासून वाटत असेल व मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश पाळून उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रिंगरोड लोकवस्तीमधून जातो. यामुळे या संपूर्ण रिंगरोडवर रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अगदी शून्य असल्याचे दिसून येते. या मार्गावरील ब्लिंकर दिवेसुद्धा ठिकठिकाणी बंद पडलेले आहेत. रस्त्यांवरील खड्डे, सूचना फलक, झेब—ा क्रॉसिंग पट्टे, रिफ्लेक्टर, ठिकठिकाणचे बंद पथदीप अशा सर्व बाबींचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

औरंगाबाद रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालये आणि लॉन्स असल्याने लग्नसराईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. पालिका प्रशासनाने अनेकदा कार्यालये आणि लॉन्सचालकांना नोटिसा देत पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु ठराविक मंगल कार्यालये आणि लॉन्सचालकांनीच पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र इतर कार्यालयांमध्ये येणारी वाहने ही रस्त्यालगतच लागलेली असतात. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते.

गतिरोधकाचे 23 प्रस्ताव प्रलंबित
मिरची हॉटेल सिग्नल चौफुलीवर नियमित छोटे-मोठे अपघात होत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, पोलिस व पालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे गतिरोधक बांधण्यासाठी 28 नोव्हेंबर 2018 रोजी पहिले व 8 फेब—ुवारी 2019 रोजी दुसरे पत्र दिलेले आहे. मात्र, जिल्हाधिकार्‍यांकडे या चौफुलीसह शहरातील असेच 23 प्रस्ताव प्रलंबित आहेत. याला नक्की मंजुरी कधी मिळणार की आणखी अपघात होण्याची व आणखी बळी जाण्याची वाट पाहावी लागणार हे मात्र अनुत्तरित आहे.

.म्हणून रिंगरोडवर वाहनांची वर्दळ
शहरापासून अगदी जवळून मुंबई-आग्रा, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्गांना कोणार्कनगर, तपोवन-जेजुरकर मळा, टाकळी, विजय-ममता, डीजीपीनगर, वडाळागाव मार्गे जोडणार्‍या रिंगरोडवरून अवजड वाहतूक मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. द्वारका चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहतूक या मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच 2007 मध्ये जेलरोडला शाळेच्या बसचा अपघात झाल्यानंतर नांदूर नाका ते बिटको चौक अवजड वाहनास बंदी घालण्यात आली. यामुळे या महामार्गावरून ये-जा करणारी परराज्यांमधील अवजड मालवाहू वाहने या रस्त्याचा वापर करतात.

मुख्यमंत्र्यांची घोषणा विरणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांसह अनेक राजकीय नेत्यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी वारंवार अपघात घडणार्‍या जागांवर उपाययोजना करा, अशी ताकीद दिली. आता यानंतर प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करणार की, परिस्थिती 'जैसे थे'च राहणार, मुख्यमंत्र्यांनी ब्लॅक स्पॉटच्या उपयोजनांबाबत केलेली ही घोषणा हवेतच विरणार हे येणार्‍या काळात दिसेल.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news