तारेही फिरतात एकमेकांभोवती | पुढारी

तारेही फिरतात एकमेकांभोवती

कॅलिफोर्निया : ब्रह्मांडात अगणित तारे आहेत. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ अशा खगोलीय पिंडांचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. अशाच एका प्रयत्नात त्यांनी तार्‍यांच्या एका जोडीचा शोध लावला आहे. ज्यांचा अत्यंत कमी ऑर्बिटियल पीरियड आहे. हे तारे एकमेकांभोवतीचा फेरा अवघ्या 51 मिनिटांत पूर्ण करतात. खगोलशास्त्रज्ञांनी तार्‍यांच्या या प्रणालीला ‘ केटाक्लिसमिक व्हेरियबल’ असे नाव दिले आहे.

दोन तार्‍यांपैकी एक पांढर्‍या शुभ्र कक्षेत चारही बाजूने फिरत असतो. तर दुसर्‍याचा कोअर अत्यंत उष्ण आहे. या नव्या केटाक्लिसमिक व्हेरिएबलच्या शोधासंबधीची माहिती नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या शोधाच्या माध्यमातून तार्‍यांच्या सर्वात लहान कक्षेचा शोध लागला आहे. हे तारे यापूर्वी शोधण्यात आलेल्या तार्‍यांपेक्षा वेगळे आहेत. शास्त्रज्ञ आता या दोन्ही तार्‍यांचा सखोल अभ्यास करत आहेत. या अभ्यासाच्या माध्यमातून दोन तार्‍यांची ही प्रणाली सध्या कोणत्या प्रकारे कार्यरत आहे आणि लाखो वर्षांत ती कशी विकसित होईल, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करणार आहेत.

पुढील 70 दशलक्ष वर्षांत हे तारे आणखी एकमेकांजवळ येतील. त्यावेळी त्यांचा एकमेकांभोवतीचा फेरा अवघ्या 18 मिनिटात पूर्ण होईल. हा एक अत्यंत महत्त्वाचा शोध असून याचा सविस्तर अभ्यास केल्यास या खगोलीय पिंडांच्या निर्मितीबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे संशोधक पप्पलार्डो फेलो केविन बर्ज यांनी सांगितले आहे.

Back to top button