पक्षाचे नाव, चिन्हासाठी ठाकरेंकडून तीन पर्याय; त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य

पक्षाचे नाव, चिन्हासाठी ठाकरेंकडून तीन पर्याय; त्रिशूळ, मशाल, उगवता सूर्य
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पक्ष संघटनेच्या स्थापनेपासून जोपासलेला लढाऊ बाणा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा स्पष्टपणे अधोरेखित करणारी चिन्हे आणि नावांचा प्रस्ताव शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रविवारी पाठविला. त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन पर्यायी चिन्हे शिवसेनेने सुचवली आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा समावेश करून शिवसेनेने याच पक्षनावाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. दरम्यान, पक्ष आणि चिन्हाबाबत उद्या (सोमवारी) प्रस्तावित नावांची घोषणा करण्याचा निर्णय रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गटाच्या बैठकीत घेण्यात आला. तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांवर बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांनी रविवारी 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर ही माहिती माध्यमांना दिली. आता निवडणूक आयोग यातील कोणते नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरे गटाला देणार हे सोमवारीच कळेल. शिवसेनेतील फूट आणि अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव पक्ष चिन्ह गोठवले. त्याचबरोबर दोन्ही गटांना केवळ शिवसेना हे मूळ नाव वापरता येणार नसल्याचा अंतरिम आदेश दिला. नवीन पर्यायी नावांत शिवसेना असा उल्लेख करता येईल, अशी मुभा देतानाच पक्षासाठी अशी तीन नावे आणि आयोगाच्या यादीतील तीन चिन्हे निवडून तसा प्रस्ताव सोमवारी दुपारी एकपर्यंत सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले होते. ठाकरे गटाकडून , शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावांचे प्रस्ताव दिले आहेत.

बैलजोडी, गायवासरू चिन्हही गोठवले होते

सत्तरच्या दशकात (1967) काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी इंदिरा काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस असे गट पडले होते. त्यावेळी काँग्रेसचे मूळ चिन्ह नांगर जुंपलेली बैलजोडी होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवून इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला गायवासरू चिन्ह दिले. पुढे आणीबाणीवेळी पुन्हा काँग्रेस फुटली आणि गायवासरू चिन्हावरून पुन्हा वाद झाला. त्यावेळी गायवासरू चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर 1971 मध्ये हाताच्या पंजाचा जन्म झाला. बिहारमधील रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीमध्ये 2021 मध्ये फूट पडली. पासवान यांचा मुलगा चिराग पासवान आणि बंडखोर गट असे दोन गट तयार झाले. त्यावेळी निवडणूक आयोगाने लोकजनशक्ती पार्टीचे मूळ झोपडी हे चिन्ह गोठवले व पासवान यांच्या मुलाला हेलिकॉप्टर तर बंडखोर गटाला शिवणयंत्राचे चिन्ह दिले होते.

धनुष्यबाणावर आमचाच दावा : सावंत

नवीन चिन्हांचा आणि नावांचा प्रस्ताव हा तात्पुरता विषय आहे. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीपुरता हा विषय आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावरचा आमचा दावा कायम आहे. आयोगाने अंतरिम निर्णय दिला, त्यानुसार आम्ही सध्याचे प्रस्ताव पाठविले आहेत. अंतिम सुनावणी बाकी आहे. त्यात आम्ही शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावरचा आमचा दावा कायम ठेवणार आहोत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news