समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे निधन | पुढारी

समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या ‍वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी दिली आहे. त्यांच्यावर ग्रुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. ” माझे आदरणीय पिता आणि सर्वांचे नेते या जगात राहिले नाहीत,” असे अखिलेश यादव यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. मुलायमसिंह यादव यांचे आज सकाळी ८.१६ वाजता निधन झाल्याची माहिती मेदांता रुग्णालयाने दिली आहे.

मुलायमसिंह यादव यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायमसिंह (Mulayam Singh Yadav) यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांना एक महिन्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यांचा रक्तदाबही वाढला होता. डॉक्टर त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मेदांताच्या आयसीयूत हलवण्यात आले होते.

उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्‍य. येथील राजकारणही राज्‍यासारखेच बहुरंगी. आजवर देशाला अनेक नेते देणार्‍या या राज्‍यातील मुलायमसिंह यादव नावाचा दिग्‍गज नेता देशाला दिला. उत्तर प्रदेशमध्‍ये सायकलवरुन आपल्‍या राजकीय जीवनाला प्रवास करणार्‍या या नेत्‍याने उत्तर प्रदेशचे तीनवेळा मुख्‍यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रीपदे भूषवले. समाजवादी पार्टीच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी स्‍वबळावर सत्ताही आणली. जाणून घेवूया मुलायमसिंह यावद यांच्‍या राजकीय प्रवासाविषयी…

Mulayam Singh Yadav Death : सर्वसामान्‍य शेतकरी कुटुंबात जन्‍म

प्रदेशमधील इटावा जिल्‍ह्यातील सैफई गावात २२ नोव्‍हेंबर १९३९ रोजी मुलायमसिंह यादव यांचा एका सर्वसामान्‍य कुटुंबात जन्‍म झाला. इटावा येथे मुलायमसिंग यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्‍यानंतर पुढील शिक्षणासाठी ते शिकोहाबाद येथे गेले. १९६५ मध्‍ये करहल येथील जैन कॉलेजमध्‍ये ते शिक्षक म्‍हणून रुजू झाले.

समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्‍या विचारांचा प्रभाव

देशात ६०च्‍या दशकात समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्‍या विचारांनी तरुणाई भारावली होती. उत्तर प्रदेशमधील इटावा येथे त्‍यांची सभा होती. या सभेला मुलायमसिंह यादव यांनी हजेरी लावली आणि त्‍यांच्‍या राजकीय जीवनाची दिशा ठरली. प्रजा सोशलिस्‍ट पक्षानंतर डॉ. लोहिया यांनी संयुक्‍त सोशलिस्‍ट पार्टीची स्‍थापन केली. या पक्षात मुलायमसिंह यादव सक्रीय सदस्‍य झाले. गरीब, शेतकरी, मागसवर्गीय यांच्‍या हक्‍कांसाठी ते आंदोलनात ते सक्रीय झाले. राजकारण, कुस्‍ती आणि गुरुजी असा त्‍यांचा प्रवास सुरु झाला.

कुस्‍तीचे मैदान गाजविणारा राजकारणी

कुस्‍तीचे मैदान गाजविणारा पैहलवान अशीही त्‍या काळात मुलायमसिंग यादव यांची ओळख होती. जसवंत नगर येथे एक कुस्‍ती मैदान भरले होते. यावेळी तरुण मुलायमसिंग यांची आमदार नाथुसिंग यांच्याबरोबर ओळख झाली. या मैदानात काही सेंकदातच मुलायम यांनी मैदान मारलं. त्‍याच क्षणी नाथुसिंग यांनी त्‍यांना आपलं शिष्‍य केले. यानंतर १९६७ मध्‍ये वयाच्‍या अवघ्‍या २८ व्‍या वर्षी यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. मुलायमसिंग यांचे गुरु नाथुसिंग यांनी त्‍यांना जसवंतनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदारसंघात से सोशलिस्‍ट पार्टीचे उमेदवार म्‍हणून रिंगणात उतरले. शिक्षक असणार्‍या मुलायमसिंह यांची ओळख मास्‍टर नेता अशीही झाली.

सायकलवरुन प्रचार, एक व्‍होट एक नोटचा नारा

विधानसभा निवडणुकीच्‍या रिंगणात उतरलेल्‍या मुलायमसिंग यांच्‍यासमोर आव्‍हान होते काँग्रेस तत्‍कालिन दिग्‍गज नेते हेमवंती नंदन बहुगुणा यांचे शिष्‍य ॲड. लखनसिंह यांचे. निवडणूक लढविण्‍यासाठी मुलायमसिंह यादव यांच्‍याकडे पैसेच नव्‍हते. यावेळी त्‍यांनी एक व्‍होट एक नोटचा नारा दिला. वर्गणीसाठी ते एक रुपया मागत आणि तो व्‍याजासह परत देवू, अशी ग्‍वाही देत. मित्र दर्शन सिंह यांच्‍याबरोबर सायकलवरुन प्रचार केला. या निवडणुकीत विजय मिळवत वयाच्‍या २८ व्‍या वर्षी मुलायमसिंह यादव आमदार झाले.

लोकदलाचे अध्‍यक्ष ते उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते

१२ नोव्‍हेंबर १९६७ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन झाले. त्‍यांच्‍या निधनानंतर सोशलिस्‍ट पार्टी कमकुवत झाली. १९६९मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांना पराभवाचा धक्‍का बसला. त्‍याच काळात चौधरी चरणसिंग यांचा भारतीय लोकदल पक्ष झपाट्याने वाढत होता. पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील शेतकर्‍यांचे नेते अशी त्‍यांची ओळख होती. त्‍यांच्‍या पक्षात मुलायमसिंग यादव यांनी प्रवेश केला. यानंतर त्‍यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. १९७७ मध्‍ये ते प्रथम राज्‍यमंत्री झाले. यानंतर १९८० मध्‍ये चौधरी चरणसिंग यांच्या लोकदलाचे अध्यक्ष बनले. मात्र यावर्षी झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. जेव्‍हा लोकदल हा जनता दलाचा घटकपक्ष झाला तो १९८२ मध्‍ये उत्तर प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी मुलायमसिंह यादव यांची निवड झाली.

१९८९मध्‍ये मुख्‍यमंत्रीपदी निवड

५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायमसिंह यादव पहिल्‍यांदा उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री झाले. या काळात श्रीराम जन्मभूमी मुद्‍दा खूपच चर्चेत होता. याच वेळी भाजपने रथयात्रेचे आयोजन केले होते. याच काळात त्‍यांचे भाजप नेत्‍यांबरोबरील संबंध बिघडले. भाजपची रथयात्रा हे धार्मिक व्‍देष पसरवत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. १९९०मध्‍ये केंद्रातील व्‍ही. पी. सिंग यांचे सरकार कोसळले. यानंतर मुलायमसिंह यांनी जनता दलात प्रवेश केला. काँग्रेसचे समर्थन मिळवत ते मुख्‍यमंत्री झाले.

अशी झाली समाजवादी पार्टीची स्‍थापना

१९९१ मध्‍ये काँग्रेस पक्षाने मुलायमसिंह यांच्‍या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्‍यांचे सरकार कोसळले. या घटनेतूनच पुढे समाजवादी पार्टीचा पाया घातला गेला. त्‍यांनी १९९२ मध्‍ये समाजवादी पार्टीची स्‍थापना केली. १९९३ मध्‍ये मायावतींच्‍या बहुजन समाज पार्टीबरोबर आघाडी केली. मात्र या आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले नाही. यानंतर जनता दल आणि काँग्रेसच्‍या पाठिंब्‍यावर मुलायमसिंह यादव पुन्‍हा एकदा मुख्‍यमंत्री झाले. याच काळात स्‍वतंत्र उत्तराखंड राज्‍याची मागणी होत होती. यावेळी त्‍यांना अनेक विवादांचा सामना करावा लागला.

१९९६ पंतप्रधानपदाच्‍या शर्यतीमध्‍ये होते आघाडीवर नाव

१९९६ मध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले. मुलायमसिंह यादव मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. यावेळी त्‍याचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना साथ दिली नाही. लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांनीही त्‍यांना विरोध केल्‍यामुळेच त्‍यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली, अशी चर्चा त्‍यावेळी रंगली होती. एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तसे संरक्षणमंत्री होते. संरक्षणमंत्री करण्यात आले, पण हे सरकारही फार काळ टिकले नाही. १९९९ मध्‍ये मुलायम सिंह संभल मतदारसंघातून पुन्‍हा लोकसभा खासदार झाले.

Mulayam Singh Yadav Death : तीनवेळा झाले उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री

२००२ मध्‍ये मुलायमसिंग यादव हे बहुजन समाज पार्टीच्‍या बंडखोर आमदार आणि अपक्षांच्‍या पाठिंब्‍यावर तिसर्‍यांदा उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय जगतात मुलायमसिंह यादव यांना प्रेमाने नेताजी असे संबोधले जात असे. 5 डिसेंबर 1989 ते 24 जानेवारी 1991, 5 डिसेंबर 1993 ते 3 जून 1996 आणि 29 ऑगस्ट 2003 ते 11 मे 2007 या कालावधीत
त्‍यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळली होती.

समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्‍ये घडवला होता इतिहास

2012 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. उत्तर प्रदेशात सपा स्वबळावर सरकार स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ होती. मुलायमसिंह यादव यांचे पुत्र आणि सपाचे प्रदेशाध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सरकारविरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरात मांडला आणि राज्याच्या विकासाचा अजेंडा समोर ठेवला. या निवडणुकीत समाजवादी पार्टीला ऐतिहासिक यश मिळाले. यावेळी मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री केले.

हे ही वाचा :

Mulayam Singh Yadav Death : उत्तर प्रदेशच्‍या राजकारणाला कलाटणी देणारे ‘मास्‍टर’ नेते मुलायमसिंह यादव

 

Back to top button