‘नगर-शिर्डी’चे साडेआठ कोटी खड्ड्यांत ! एकाच पावसात ठेकेदाराचे पितळ पडले उघडे | पुढारी

‘नगर-शिर्डी’चे साडेआठ कोटी खड्ड्यांत ! एकाच पावसात ठेकेदाराचे पितळ पडले उघडे

गोरक्षनाथ शेजूळ : 

नगर : नगर-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील जागोजागच्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सुरू आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग दुरुस्त होईल, या आशेने असंख्य प्रवासी हे ‘श्रद्धा आणि सबुरी’ने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, शासनाने रस्ता दुरुस्तीसाठी तब्बल साडेआठ कोटींचा खर्च करूनही प्रवाशांची साडेसाती अजूनही काही संपताना दिसत नाही. ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने साडेआठ कोटींची कामे आठ दिवसांतच उघडी पडल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षभरापासून नगर-शिर्डी महामार्गाची दुरवस्था हा प्रश्न राज्यात चर्चेत आला आहे. याविषयी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, प्रवाशांनीही अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले. मध्यंतरी पुण्याच्या शिंदे कंपनीने हे काम सुरू केले होते. मात्र, कथित टक्केवारीच्या चर्चेतून ठेकेदाराने हे काम आपल्याला परवडत नसल्याचे सांगून गाशा गुंडाळला. त्यानंतर अर्धवट कामाचे पुन्हा टेंडर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, तो पर्यंत रस्त्यावरील मोठमोठी खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून 8.50 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. मुंबई येथील जयहिंद कंपनीने संबंधित दुरुस्तीचे काम हाती घेतले.

नगर ते सावळीविहिर दुरुस्तीची जबाबदारी
नगर ते सावळी विहिर या साधारणतः 75 किलोमीटर अंतरावरील खड्डे बुजविणे, खड्डे बुजविल्यानंतर डांबर पॅच व इतर मजबुती करणे, अशाप्रकारचे काम संबंधित ठेकेदाराला दिले होते. नवीन ठेकेदार येईपर्यंत अर्थात नवीन टेंडर होईपर्यंत रस्त्याच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी जयहिंद’कडे देण्यात आलेली आहे. मात्र, ठेकेदाराने खड्डे बुजविताना ठराविक खड्ड्यांत मुरुम-माती भरून निकृष्ट काम केले आहे. राहुरीत हे काम निकृष्ट सुरु असतानाच नागरिकांनी संतापही व्यक्त केला होता.

पुन्हा खड्ड्यांतून प्रवास! ठेकेदाराने खड्डे बुजविण्यासाठी मुरुम-माती वापरल्याची चर्चा आहे. त्यावर कोणतेही डांबर टाकले नाही किंवा खड्डे चांगल्या प्रकारे बुजले जातील, यासाठी प्रयत्न केला नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच एकाच पावसात आठ दिवसांपूर्वी बुजविलेले खड्डे पुन्हा गुडघाभर दिसू लागले आहे. यातून ठेकेदाराच्या कामाची ‘गुणवत्ता‘ आणि अधिकार्‍यांची त्यांच्याप्रती ‘एकनिष्ठता’ दिसून येत आहे.

900 कोटींचे टेंडर अन् पुन्हा चर्चा टक्केवारीची..!

नगर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गासाठी 900 कोटींचे टेंडर काढले जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ते नेमके कधी निघणार, काम कधी सुरू होणार, पुन्हा टक्केवारीची अडचण येणार का, काम वेळेत पूर्ण होणार का? याविषयी आतापासूनच कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान, जानेवारीत हे टेंडर फ्लॅश होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

 

नगर ते सावळीविहीर दुरूस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. खड्डे बुजविल्यानंतर डांबरीकरण केले जाईल. सहा महिने ही देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आहे. पावसाळा संपल्यानंतर दुरुस्तीला आणखी गती येईल.
     – मिलिंदकुमार वाबळे महाप्रबंधक, तांत्रिक विभाग, राष्ट्रीय महामार्ग, नगर

Back to top button