नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) येथे कोरड्या व पडक्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी (दि.20) सकाळी 8.30 वाजता घडली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या विहिरीतून बाहेर चढून आला आणि त्याने शेजारच्या उसात धूम ठोकली.
फुलेनगर शिवारात खंडेराव पठाडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम सुरू होते. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या
सुमारास उसाची तोडणी सुरू असताना मजुरांना बिबट्या दिसला. मजुरांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि राहिलेला शिल्लक ऊस पेटवून दिल्यानंतर बिबट्याने उसातून धूम ठोकली.
दत्तात्रय आनप आणि सुरेश आनप यांच्या सामाईक विहिरीत बिबट्या पडला. कुंत्रे भुंकण्याचा आवाज येतअसल्याने आनप आणि माळी कुटुंबीयांनी बिबट्या विहिरीत पडताना पाहिला. विहीर सुमारे 60 ते 65 फूट खोल आहे. तथापि, सदर विहिरीत उन्हाळ्यामुळे एका कोपर्यात केवळ तळाला गुडघाभर पाणी होते.
घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले. विहिरीत पडलेला बिबट्या जवळच असलेल्या उसात लपल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी फुलेनगर येथे पोहोचले. सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी ए. बी. साळवे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, महेंद्र पटेकर, नारायण वैद्य आदींनी घटनास्थळी पिंजरा लावला.
विहीर परिसरात बघ्यांची गर्दी…
विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी पसरल्यानंतर गर्दी झाली. वनविभागाला विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती देण्यात आली. सुमारे दीड तास बिबट्याचे विहिरीतून बाहेर येण्याचे प्रयत्न सुरू होते. काही वेळाने बिबट्या विहिरीतून चढून वर आला आणि त्याने शेजारील भाऊसाहेब पठाडे यांच्या उसात धूम ठोकली.