पुणे : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण, धक्काबुक्की तसेच विनयभंग केल्याप्रकरणी तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी शनिवारी (दि. 21) होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भस्मराज तिकोणे (रा. साततोटी चौक, कसबा पेठ), प्रमोद कोंढरे (रा. नातूबाग, बाजीराव रस्ता, शुक्रवार पेठ), मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ) या तिघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. मारहाण, धक्काबुक्की तसेच विनयभंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकारी महिलेने फिर्याद दिली आहे. 'अमित शहा आणि भाजपची वाटचाल' या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी बालगंर्धव रंगमंदिरात झाले. या कार्यक्रमास भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वाढत्या महागाईच्या निषेधार्थ इराणी यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिरात गेले होते. त्या वेळी महागाईच्या निषेधार्थ घोषणा दिल्याने भाजपचे कार्यकर्ते चिडले. त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांना धक्काबुक्की केली तसेच अश्लील हातवारे केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात तिघांनी न्यायालयात धाव घेतली असून शनिवारी याची सुनावणी होणार आहे.
गुन्हा दाखल झालेल्या तिघांचा फोन बंद होता. तिघांच्या घरी चौकशी केली असता तिघे आढळून आले नाहीत. न्यायालयात ते अटकपूर्व जामिनासाठी गेले आहेत का, याबाबत आम्हाला अद्याप कोणतीही कल्पना देण्यात आली नाही.
– मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे