कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा; शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान येथे ताटात रस्सा सांडल्याच्या करणातून वाद होऊन दोघांवर चाकू हल्ला झाला होता. या घटनेत ओंकार माने हा जखमी झाला होता. आज (शनिवारी) सकाळी सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. औरवाड परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले आहे.
या प्रकरणी अटकेत असलेले संशयित आरोपी ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार (दोघे रा. शिकलगार वसाहत, कुरुंदवाड ता. शिरोळ) कुलदीप संकपाळ (रा. शेडशाळ ता. शिरोळ) या तिघांवर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास शेडशाळ (ता. शिरोळ) येथील हॉटेल समाधान ढाबा येथे संशयित आरोपी शिकलगार व संकपाळ हे तिघे आणि जखमी ओंकार माने व अमीन महंमद पटेल हे जेवत होते. यावेळी एकमेकांचा धक्का लागल्याने बाचाबाची झाली. यावेळी या घटनेचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले. माने व पटेल यांच्यावर संशयित आरोपींनी चाकूने वार करून जखमी केले होते. यातील जखमी ओंकार माने याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.