नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस आयुक्तालयाच्या वतीने गुरुवार (दि. १)पासून शहरात हेल्मेट सक्ती मोहीम राबविण्यात येत आहे. यात तीन दिवसांत पोलिसांनी एक हजार ४२५ चालकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांना सात लाख १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे चालकांना वेळेसह आर्थिक फटकाही बसत आहे. मात्र, तरीदेखील चालक हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करत आहे.
दुचाकीचालकांनी हेल्मेट न घातल्याने त्यांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे अनेक अपघातांमध्ये समोर आले. त्यामुळे न्यायालयानेही दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केली आहे. त्यानुसार शहरात दरवर्षी हेल्मेट सक्ती मोहीम राबवली जाते. मात्र, मोहीम संपल्यानंतर चालक हेल्मेट वापरत नसल्याचे चित्र असते. यंदा एक डिसेंबरपासून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यात पोलिसांच्या ट्विटर खात्यावरून पूर्वसंध्येस कोणत्या परिसरात व किती वाजता कारवाई होणार आहे याची पूर्वकल्पना नाशिककरांना दिली जाते. त्यानंतर सकाळ व सायंकाळच्या सत्रात पोलिसांंकडून मोहीम राबवून विना हेल्मेट दुचाकीचालकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार गुरुवार ते शनिवारदरम्यान शहर पोलिसांनी २४ ठिकाणी कारवाई केली आहे. त्यात एक हजार ४२५ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर काही चालकांनी कारवाई टाळण्यासाठी पर्यायी मार्गांवरून जाण्यास प्राधान्य दिले, तर काहींनी पोलिसांना पाहून तेथूनच माघारी फिरले. पोलिसांना पाहून काही चालक जागीच थांबत असल्याने किंवा माघारी फिरत असल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवणाऱ्यांना बेशिस्त चालकांमुळे नाहक फटका बसण्याचाही धोका आहे.
हॉर्न वाजविणाऱ्यांवर कारवाईची मागणी
हेल्मेट सक्तीसोबतच कर्णकर्कश हॉर्न वाजवणाऱ्या, वाहनाचे सायलेन्सर बदलवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी पोलिसांच्या ट्विटर खात्यावरही नागरिकांनी ट्विट करत मागणी केली आहे.