नागपूर, चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भूगर्भातील नैसर्गिक संपत्तीने संपन्न असलेल्या विदर्भात चंद्रपूर काळ्या सोन्यासाठी आजपर्यंत प्रसिद्ध होते. आता भविष्यात या जिल्ह्याला पिवळ्या धमक सोन्याची झळाळी मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव आणि राजोली पेठगावलगतच्या बामणी येथे भूगर्भात सोने असल्याचे केंद्र सरकारच्या भारतीय भूसर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आल्याने जिल्ह्याला भविष्यात अधिकच महत्त्व येणार आहे.
सात वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या भारतीय भूसर्वेक्षण विभागाने या दोन्ही ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते. सिंदेवाही ते नवरगाव मार्गापासून चार कि.मी. अंतरावर अंतर्गत भागातील मिनघरी गाव आणि याच तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या राजोली पेठगावलगतच्या बामणी गावालगत हे सर्वेक्षण 2013 ते 2015 असे दोन वर्षे चालले. जमिनीखालच्या विविध स्तरांवर आढळणार्या मातीच्या नमुन्यांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करण्यात आले. मुळात तांब्याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, तांब्याचा शोध घेत असताना सोने असल्याचे आढळून आले.
नवरगावपासून चार कि.मी. अंतरावर मिनघरी नावाचे 1850 लोकसंख्येचे गाव आहे. या परिसरात पांढरा दगड असलेली पांढरी हुडकी नावाने 50 एकरचा भूभाग आहे. याच परिसरातून घोडाझरी कालवा गेला आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंना व अन्य एका ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या पद्धतीने बोअरिंग करून भूगर्भातील नमुने घेण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या संशोधन यंत्रणेला पाठविण्यात आले. त्या नमुन्यांवर पृथ:करण करून त्यामध्ये सोन्याचे प्रमाण शोधून काढण्यात आले. दोन वर्षे हे सर्वेक्षण सुरू असताना कमालीची गुप्तताही बाळगण्यात आली.
मिनघरी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. परिसरात धानाचे (भात) उत्पादन घेतले जाते. काळ्या, मुरमी व वाळूमिश्रित शेतमातीचा परिसर आहे. सर्वेक्षण केलेल्या परिसरात पांढर्या रंगाचे दगड आढळतात. त्यावरून पांढरी दगडांची हुडकी म्हणून या ठिकाणाची ओळख आहे. सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवरील दुसरे ठिकाण बामणी (रिटी) गावाचे आहे. दोन्ही ठिकाणांतील अंतर 15 ते 20 कि.मी. आहे. राजोली पेठगावपासून दीड कि.मी. अंतरावर बामणी वसले आहे. ते कुकडहेटी ग्रामपंचायतीत येते. रिटी गावात आता 15 ते 20 कुटुंबे वास्तव्यास आहेत. या परिसरातील लोकांचे उत्पन्नाचे साधन शेती हेच आहे. या परिसरात मोठ्या आकाराचे दगड व मुरुम असलेली जमीन आहे. शेती उत्पन्नाचे साधन आहे.
मुंबईत नुकतीच मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योगांबाबत एक बैठक झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बानेवाडी व धनपेवाडी येथील सोन्याच्या खाणींबाबत चर्चा झाल्यावर सिंदेवाही तालुक्यात झालेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांबाबतही चर्चा झाल्याने विदर्भातील सोन्याच्या खाणींची जोरात चर्चा सुरू झाली. दोन्ही ठिकाणी भूगर्भात तांबे आणि सोन्याचे साठे असल्याचे आढळून आले आहेत.
भारतीयांचे सोन्याचे प्रेम जगजाहीर आहे. पण भारतात जमिनीत सोने फार ठिकाणी सापडत नाही. भारतात फक्त तीन ठिकाणी सोन्याच्या खाणी आहेत. कोलारची खाण सर्वात मोठी आहे. आता सिंधुदुर्ग, चंद्रपूर ही नवीन सोन्याची खाणी असलेली शहरे होतील. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात शिरपूर गोल्ड रिफायनरी आहे. तेथे खाण नसली तरी कच्च्या स्वरूपातील साठ्यातून सोने व चांदी तयार करण्याचा शुद्धीकरण प्रकल्प आहे. 50 एकर परिसरात असलेल्या या प्रकल्पातून वर्षाला 217 मेट्रिक टन शुद्ध सोने व चांदी तयार होते. महाराष्ट्राच्या जमिनीत विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. लोह, तांबे, बॉक्साईट, मँगेनीजसारखे खनिज महाराष्ट्रात सापडते.
कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध विदर्भात सोन्याच्या खाणीचे संकेत मिळणे महत्त्वाचे मानले जात आहे. कधीकाळी वर्हाड सोन्याची कर्हाड असे म्हटले जायचे. काळ्या आईच्या कुशीत काळे सोने म्हणजे कोळसा, पांढरे सोने म्हणजे कापूस पिकत होता. आता भविष्यकाळात विदर्भाच्या कुशीतून सोने बाहेर पडू शकते. ब्रिटिश काळातही झालेल्या सर्वेक्षणात उमरेड, भिवापूर परिसरात नदीच्या पात्रात सोन्याचे कण सापडल्याची माहिती जुने जाणते आजही सांगतात. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड-भिवापूर परिसरातील काही भागात सोन्याच्या खाणी असल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय खनिज मंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच माहिती दिली.
या भागाचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, ही बातमी आनंदाची आहे. विदर्भाचा झपाट्याने विकास या माध्यमातू होईल. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संसदेच्या येत्या अधिवेशनात हा विषय निश्चित मांडू. लवकरात लवकर या जमिनीचे उत्खनन करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोन्याच्या साठ्यांबाबत केंद्रीय यंत्रणा, खनिकर्म विभाग यांना भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून माहिती मिळाली असली तरी कायदेशीर बाबी तपासून पुढील पावले उचलली जातील. महामंडळामार्फत पुढील काम करावे की स्वतंत्र खनिज संशोधन संस्था स्थापन करून याबाबतीत पुढे जायचे याविषयीचा निर्णय लवकरच संबंधित यंत्रणांच्या बैठकीत होणार असल्याची माहिती राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली.